छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त शिवभक्तांच्या वतीने शहरात अभूतपूर्व दुचाकी रॅली काढून शिवरायांना अभिवादन केले.
गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहर भगव्या झेंडय़ांनी सजवण्यात आले. सिद्धेश्वर देवस्थानच्या आवारातून सकाळी साडेदहा वाजता दुचाकी रॅलीस प्रारंभ झाला. सिद्धेश्वर मंदिर ते अहल्यादेवी होळकर चौक, अंबाजोगाई रस्त्यावरून शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, बसवेश्वर चौक, विवेकानंद चौक, शाहू चौक, गांधी चौक ते शिवाजी चौक या मार्गावर रॅली काढण्यात आली. रॅलीत सुमारे ४० हजार दुचाकीस्वार सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. शहरातील विविध चौक सजवण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या वेळचे वातावरण शिवजन्मोत्सवानिमित्त तयार झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक मिरवणूक बघण्यास उभे होते. उड्डाणपुलावर तरुणांचा मोठा जथ्था मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करीत होता. चौकाचौकात पिण्याचे पाऊच वितरित केले जात होते. शिवाजी चौक भव्यतेने सजवला होता. मुख्य मिरवणूक निघण्यापूर्वी मिरवणूक मार्गावर ऑटोरिक्षा रॅली काढून वातावरणनिर्मिती करण्यात आली. सुमारे शंभर महिला दुचाकी घेऊन सहभागी झाल्या होत्या. डोक्याला भगवे फेटे, तर काही तरुणांनी भगवे कपडे परिधान केले होते.
उदगीर, अहमदपूर, चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर, मुरूड, औराद शहाजनी, कासारशिरसी आदी ठिकाणीही शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरात मुस्लीम समाजाच्या पुढाकाराने स्वतंत्र रॅली काढण्यात आली. गंजगोलाईपासून शिवाजी चौकापर्यंत ताजोद्दीनबाबा, मोहन माने आदी मंडळींनी ही मिरवणूक काढण्यात पुढाकार घेतला.
पानगावात पोलीस चौकीवर दगडफेक
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे गुरुवारी भगवे झेंडे लावले होते. काही ठिकाणचे झेंडे रात्रीतून पोलिसांनी काढले, असा समज करून घेत शुक्रवारी सकाळी जमावाने पोलीस चौकीवर हल्ला करून दगडफेक केली. जमावाचा रुद्रावतार पाहून एक पोलीस पळून गेला, तर दुसऱ्या पोलिसाला जमावाने बेदम मारहाण करीत त्याच्या हातात झेंडे देऊन ज्या ठिकाणी झेंडे काढले होते त्या ठिकाणी लावण्यास भाग पाडले. त्याला जमावाने मिरवणूक काढावी त्या पद्धतीने रस्त्यावरून नेले. याची माहिती मिळताच रेणापूरचे तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गावास भेट दिली. सध्या गावात शांतता असून जखमी पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा