जालना-मुंबई हाय स्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटन सोहळा वादाचा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे एमआयएम आणि भाजपाचे कार्यकर्ते समोरा-समोर आलेले पाहायला मिळाले. खासदार इम्तियाज जलील यांचं संभाजीनगर स्टेशनमध्ये आगमन झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. तर, पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशन बाहेर काढलं.
जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून तिचं उद्घाटन पार पडेल. पण, उद्घाटन पत्रिकेत नाव नसल्याचं नाराजी नाट्य समोर आलं आहे. इम्तियाज जलील यांनी नाव आमंत्रण न मिळाल्यानं आणि पत्रिकेत नाव नसल्यानं भाजपावर टीका केली.
त्यातच छत्रपती संभाजीनगर येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चं आगमन होणार होतं. त्यापूर्वी इम्तियाज जलील हे रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. तर, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
“सगळ्यांची नावं वगळण्यात आली आहे”
जलील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “लोकशाही मार्गानं माझा निषेध दर्शवण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा आम्ही हातात घेतला नाही. भाजपानं हा रेल्वेचा कार्यक्रम न ठेवता पक्षाचा कार्यक्रम केला आहे. सगळ्यांची नावं वगळण्यात आली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त ‘मोदी-मोदी’ हेच काम यांना राहिलं आहे. पोलिसांनी बळजबरीनं माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं.”
“रेल्वे स्टेशन भाजपाची मालमत्ता नाही’
“माझ्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाताना रेल्वे थांबवली, तर याची जबाबदारी पोलिसांची असेल. आमच्या लोकांना बाहेर काढण्यात येत असेल, तर भाजपाच्या लोकांनाही बाहेर काढा. रेल्वे स्टेशन भाजपाची मालमत्ता नाही,” अशी टीका जलील यांनी केली आहे.
“ज्यांचं सरकार असतं ते श्रेय घेण्याचं काम करतं”
पालकमंत्री संदीपान भुमरेांनी म्हटलं, “संभाजीनगरला सुसज्ज अशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मिळाली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. प्रोटोकॉलनुसार रेल्वे विभागानं पत्रिकेत नावे टाकली असतील. पत्रिकेत कुणाचं नाव आहे नाही, हे मी पाहिलं नाही. ज्यांचं सरकार असतं ते श्रेय घेण्याचं काम करतं. जलील विरोधी पक्षाचं काम करतात.”