रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले होता. या भेटीवर संजय राऊत यांनीही टीका करताना सधू-मधूची भेट असं म्हणत शिंदे गटाला डिवचलं होतं. दरम्यान, राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय शिरसाट?
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना भेटले त्यात चुकीचं काहीही नाही. एका ठाकरेला भेटले म्हणून दुसरे ठाकरे नाराज होतात का? राज ठाकरे यांच्याकडे व्हिजन आहे. एखाद्याचा चांगला गुण घेतला, तर त्यात वाईट काय? मी मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी घेऊन येतो, त्यांची भेटायची तयारी आहे का? उद्धव ठाकरे यांच्याकडे काही चांगल्या सूचना असतील तर त्यांनी सांगावं. पण मुख्यमंत्री कोणाला भेटले तर ठाकरे गटाच्या पोटात पोटशूळ उठतो”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
“संजय राऊत मूर्खांच्या नंदनवनात वावरतात”
यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांनाही लक्ष केलं. “राज ठाकरे तुमच्यासारखे नाहीत. तुम्ही रोज सकाळी उठून कुत्र्यासारखं भो-भो करत असता. पण राज ठाकरे एकदाच बोलतात आणि सगळ्यांची हवा टाईट होते. खरं तर संजय राऊत हे मूर्खांच्या नंदनवनात वावरतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – सावरकर वादावर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच भूमिका जाहीर, शरद पवारांचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले…
संभाजीनगरमध्ये शिंदे गटाकडून धनुष्यबाण रॅली
पुढे बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाकडून धनुष्यबाण रॅली काढण्यात येणार असल्याची माहितीही दिली. “आम्ही ५ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार आहोत. त्यानंतर ८ किंवा ९ तारखेला धनुष्यबाण रॅली काढण्यात येईल. या रॅलीच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच काही ठिकाणी आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात येणार आहेत. ही रॅली राजकीय रॅली नसून एक सामाजिक यात्रा असणार आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.