छत्रपती संभाजीनगर : कधी शेती समस्येमुळे तर कधी दीर्घ आजाराने एखाद्या घरातील कर्ता पुरुष आत्महत्या करतो, तेव्हा संपूर्ण घरच उघड्यावर पडते. अशा घरातील मुलांच्या शिक्षणाची परवड होते. काही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली जातात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी आणि जिद्दीने शिकणाऱ्या मुलांच्या साहाय्यासाठी बीड जिल्ह्यातील ‘संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था’ काम करते. ‘आधार माणुसकी’च्या उपक्रमातून गरजू १५० गावांतील ७५० ते ८०० मुलामुलींना आतापर्यंत शिक्षणासाठी मदत करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतिगृह बांधण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची गरज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबाजोगाई तालुक्यातील काही भाग डोंगराळ आहे. एक पीक घेतले की, बहुतांश शेतकरी ऊसतोडणीसाठी जातात. त्यामुळे हातातोंडाशी गाठ असणाऱ्या परिवारांची संख्या जास्त आहे. एखादे मोठे आजारपण आले किंवा अपघात झाला तरी घराची परिस्थिती अधिकच खालावत जाते. घरावरचे पत्रे बदलायचे म्हटले तरी कर्ज काढावे लागते. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील हे भयावह चित्र बदलण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, महाविद्यालयांमधील शुल्क भरताना येथील विद्यार्थ्यांची अडचण होते. अशा विद्यार्थ्यांना ‘आधार माणुसकीचा’ या उपक्रमाची मदत होते.

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!

अंबाजोगाईमधील वकील संतोष पवार अशा मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्यापासून ते त्यांना पायावर उभे करण्यासाठी मदत करत आहेत. ग्रामीण भागातील लहान व तरुण मुले त्यांना आवर्जून आपल्या अडचणी सांगतात. ज्या मुलांना परिस्थितीअभावी शिकता येत नाही, त्यांना कौशल्य अभ्यासक्रम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण सुटू नये यासाठी संस्थेच्या वतीने अशा मुलांना दरवर्षी जूनमध्ये मोफत शैक्षणिक साहित्य देण्यात येते. तालुक्याच्या ठिकाणी मुलांना राहण्यासाठी वसतिगृह बांधण्याचा मानस असल्याने त्यासाठी दानशुरांनी मदत करावी असे आवाहन ‘संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थे’च्या वतीने करण्यात आले आहे.

बँकिंग पार्टनर दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant gadgebaba sevabhavi sanstha working for children of farmers who committed suicide css