औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसेनेनं कुत्रे पकडण्याच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचे गंभीर आरोप औरंगाबादचे माजी महापौर प्रमोद राठोड यांनी केले आहेत. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे हे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत याबाबतची माहिती दिली. कुत्रे पकडण्याच्या मोहिमेत शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा आपल्याला दाट संशय आहे, त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित व्हिडीओत राठोड म्हणाले की, “आमचे नगरसेवक गोकुळसिंग मलके यांनी माहितीच्या अधिकाराखाली कुत्रे पकडण्याच्या संदर्भातील माहिती मागवली होती. मागच्या पाच वर्षात किती कुत्रे पकडली आणि त्यावर किती खर्च झाला? कोणत्या संस्थेच्या माध्यमातून पकडली? याबाबतची माहिती मागवण्यात आली होती. यामध्ये असं दिसतंय की, मागच्या पाच वर्षात महापालिकेनं २८ हजार ६०० कुत्रे पकडली. यासाठी सुमारे ३ कोटीच्या आसपास खर्च केला.”

हेही वाचा- “मी अडीच वर्षात मुख्यमंत्र्याची स्वाक्षरीच पाहिली नाही”, भाजपा नेत्यांसमोर संजय शिरसाटांचा थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा

पुढे त्यांनी सांगितलं की, “कुत्रे पकडण्याचं काम महाराणा एजन्सी औरंगाबाद, ब्यू क्रॉस सोसायटी पुणे, होप अँड अनिमल ट्रस्ट झारखंड, उषा इंटरप्रायजेस राजस्थान, अरिहंत वेलफेअर सोसायटी उस्मानाबाद अशा संस्थांनाला दिलं होतं. यातील महाराणा एजन्सी सुरुवातीला २०१५-१७ च्या कालावधीत कुत्रे पकडत होती. पण नंतरच्या काळात या एजन्सीनं महापालिकेला मनुष्यबळ पुरवायला सुरुवात केली. आतापर्यंत या एजन्सीने महापालिकेला १५०० च्या वर लोकं पुरवली आहेत. ही एजन्सी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याची आहे. त्यांना महापालिकेकडून माणसं पुरवण्याचं कंत्राट जेव्हा मिळालं, तेव्हा त्यांनी कुत्रं पकडणं सोडून दिलं आणि माणसं पुरवणं सुरू केलं.”

हेही वाचा- “गुवाहाटीचे गुलाबराव पाटील खरे, की आताचे?” परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने हसन मुश्रीफांचा टोला, म्हणाले…

“पण मला असं वाटतं की, महाराणा एजन्सीनं कुत्रे पकडणं सोडून दिलं नाही, असा आमचा दाट संशय आहे. त्यांनी कुत्रे पकडण्यासाठी दुसऱ्या संस्था आणल्या. पुणे, झारखंड, राजस्थान आणि उस्मानाबाद येथील संस्थाच्या माध्यमातून त्यांनी कुत्रे पकडण्याची सोय सुरू ठेवली. कुत्रे पकडण्याच्या मोहिमेत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं आम्हाला दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे” असंही प्रमोद राठोड यावेळी म्हणाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scam by shiv sena in dog catching campaign aurangabad municipal corporation serious allegations of former mayor pramod rathod rmm
Show comments