हिंगोली : सरकारी कामातील दिरंगाईमुळे जि. प. समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणारे सायकल वाटप वर्षाअखेरीस कसेबसे पूर्ण झाले. शैक्षणिक वर्ष संपताना वाटप करण्यात आलेल्या प्रक्रियेवर पालकांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या सन २०२४-२५ मधील स्वमालकीच्या निधीतून २० टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी अर्थसासाहाय्य पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी जुलै महिन्यात पंचायत समितीकडून अर्ज मागविण्यात आले. अर्ज केल्यानंतर किमान एक महिन्यात लाभार्थ्यांची निवड होऊन सायकलसाठी अर्थसाहाय्य मिळेल अशी पालकांची अपेक्षा होती. मात्र,विधानसभा निवडणूक व दप्तर दरंगाईमुळे सायकल वाटप कसेबसे पूर्ण झाले. या योजनेसाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सायकल मिळावी यासाठी एक हजारपेक्षा अधिक अर्ज आले होते. एकूण १ हजार १७३ लाभार्थ्यांमधून ३०० जणांची निवड करण्यात आली होती. सायकल खरेदीची पावती समाजकल्याण विभागात सादर केल्यानंतर त्याची रक्कम लाभार्थ्यांना दिली जात असे. मात्र, वर्षअखेरीपर्यंत ही प्रक्रिया सुरूच हाेती.