संकरित बियाण्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. केंद्र व राज्य सरकार, तसेच बियाणे उत्पादक शेतकरी व कंपन्या यांच्या समन्वयातून येथे अंदाजे १०० एकर परिसरात सुमारे १०० कोटींच्या सीड हबची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये पार्कच्या धर्तीवर सीड हब स्थापन करण्यात येणार आहे.
कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत मुंबईत नुकतीच याबाबत बैठक झाली. या वेळी जालना येथे सीड हबसोबतच मोसंबी उद्योगाची स्थापना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. येथे अंदाजे १०० एकर परिसरात सुमारे १०० कोटींचे सीड हब निर्माण करण्यात येणार आहे. यात बियाणे उत्पादकांसाठी कोल्ड स्टोरेज प्रक्रिया केंद्र, बियाणे तपासणी प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना शेड नेट, ठिबक सिंचन, शेततळे, तांत्रिक प्रशिक्षण आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या सीड हबमुळे फक्त जालनाच नाही, तर मराठवाडय़ाचे भविष्य बदलू शकते, असे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
याच बैठकीत जालना येथे सोयाबीन व मोसंबी प्रक्रिया उद्योग निर्माण करण्याविषयी चर्चा करण्यात आली. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी उद्योग विकास महामंडळाचे संचालक अरविंद कुमार, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, संचालक पणन व इतर संबंधित अधिकारी बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावरची सर्व व्यवस्था करावी, असे निर्देश कृषिमंत्री खडसे यांनी दिले. याबाबत शासनस्तरावर समन्वयकाची नियुक्ती करण्यात येऊन प्रकल्प मार्गी लावण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
जालन्यात सीड हब स्थापन करणार
संकरित बियाण्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 02-04-2016 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seed hub will set jalna