छत्रपती संभाजीनगर : आरक्षणप्रश्नी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे आणि प्रा. लक्ष्मण हाके यांचे म्हणणे सरकारने ऐकून घ्यावे. नुसती सर्व पक्षीय बैठक घेऊन काही होणार नाही. आवश्यकता वाटल्यास विधिमंडळात उर्वरित दोन दिवसांच्या कामकाजात आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी ठराव घ्यावा. तो केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्रामध्येही न्याय हक्काच्या मागणीसाठी शिवसेना पाठिंबा देईल, असे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. संभाजीनगर येथे ‘शिवसंकल्प मेळाव्यात’ ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरक्षण प्रश्नावरून आता जिवांशी खेळू नका, प्रश्न निकाली लागावा यासाठी काम करा. केवळ दुही माजवून न्याय हक्क मिळत नसेल तर एकत्र येऊन महाराष्ट्राची ताकद दिल्लीश्वरांना दाखवा, असे म्हणत मराठा-ओबीसीमध्ये दुहीचे बीज रोवून राजकारण करू पाहणाऱ्यांना राजकीय अर्थाने संपवा, असेही ठाकरे म्हणाले. आरक्षण प्रश्नावर जातीजातींमध्ये भांडणे लावून जर भाजप मजा बघणार असेल तर तसे होऊ दिले जाणार नाही. मराठा, धनगर आणि ओबीसीच्या न्याय्य मागण्यांसाठी शिवसेना पाठीशी असेल असेही ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पंतप्रधान सौरऊर्जा योजनेस भरभरून प्रतिसाद, मात्र अंमलबजावणीत मंदगती, केंद्रराज्य यंत्रणेत समन्वयाचा अभाव

आतापर्यंतच्या सर्व पक्षीय बैठकीतून फारसे काही हाती लागले नाही. त्यामुळे आम्हाला कोणाला विचारण्यापेक्षा जे नेतृत्व करत आहेत त्या मनोज जरांगे आणि हाके यांनाच बोलावून घेऊन मार्ग काढण्यासाठी बोलावे लागणार आहे. असे करताना आरक्षण मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव विधिमंडळात आल्यास शिवसेना त्यास पाठिंबा देईल, असेही ठाकरे म्हणाले. केवळ राज्यातच नाही तर केंद्र सरकारमध्येही शिवसेनेची तीच भूमिका असेल, असे ठाकरे म्हणाले.

लाडकी बहीण योजना पापे झाकण्यासाठी

 राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही पापे झाकण्यासाठी योजनांचा सुकाळ असे म्हणावे लागेल. आता या योजनेच्या अर्जासाठी गर्दी होते आहे. पण घरात शिकलेली तरुण मुले व मुली बेरोजगार आहेत त्यांच्यासाठीही एखादी लाडके भाचे योजना सुरू करावी सरकारने. असल्या योजनांचा सुकाळ म्हणजे राजकीय मूर्खपणाच असेही ठाकरे म्हणाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Send the resolution of the legislature to the center to increase the reservation limit uddhav thackeray assurance print politics news amy
Show comments