छत्रपती संभाजीनगर – ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (११ फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांना मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पाचोळा ही त्यांची सुमारे ५५ वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या कादंबरी प्रचंड गाजली होती.

आमदार सौभाग्यवती ही कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. त्यावर नाटकही आले आहे. चारापाणी या कादंबरीला १९९० चा मराठवाडा साहित्य परिषदेचा कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला होता.  कणसं आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा आदी कथासंग्रहासह शिका तुम्ही हो शिका ही बालकादंबरी, रहाट पाळणा आदी साहित्य बोराडे यांच्या लेखणीतून उतरले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ते अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, १९८९ साली हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आदी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. यासह अनेक मान-सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आले आहे.

लेखक म्हणून रा. रं. बोराडे यांच्या ‘पाचोळा’ या कादंबरीवर ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या लिखाणातील मजकूर बोराडे यांच्या लिखाणाची व्याप्ती सांगणारा आहे. ते लिहितात, ‘ पाचोळा ’ ही कादंबरी एकाच वेळी विशिष्ट काळाची, विशिष्ट संस्कृतीची बनते. आणि तरीही ती शोकांतिकेप्रमाणे स्थलकालातीत बनते. शोकान्तिकेत असलेल्या रचनाबंधनात घडविलेल्या या कादंबरीची व्याप्ती सकृतदर्शनी जरी कमी वाटत असली तरी तशी ती नाही. आकारमानाने जरी ‘ पाचोळा ’ लहान असली तरी ती दीर्घकथा नाही. कादंबरी ही व्यक्ती, व्यक्तिसमूह यांच्या जीवनाच्या समग्रतेचा प्रत्यय देत असते. एखाद्या कादंबरीचा प्रत्यक्ष फलकातून व सामाजिक वास्तवाचा फलक जरी लहान असला तरी तिचा प्रत्यक्ष रचनेचा भाग नसलेला पण तिच्या प्रत्यक्ष फलकातून सुचवला जाणारा कालफलक व सामाजिक वास्तवाचा फलक विस्तीर्ण व व्यापक असू शकतो. रा. रं. बोराड्यांच्या ‘ पाचोळा’ या कादंबरीतील सूचित फलक दोन पातळ्यांवरचा आहे. आधुनिक जीवन पद्धतीचा स्पर्श झाल्यामुळे बदलू पाहणाऱ्या ग्राम व्यवस्थेचे आणि तिच्यात निर्माण होणाऱ्या समस्यांचे ते सूचन करीत राहते. या कादंबरीची पाळेमुळे या परिवर्तनसन्मुख ग्रामव्यवस्थेत आहे. दुसरे म्हणजे ती मानवाच्या मूलभूत प्रेरणाप्रवृत्तींतील संघर्षची कथा असल्यामुळे तिला कुठल्याही वास्तवाचा संदर्भ प्राप्त होऊ शकतो. या दृष्टीने ती सार्वकालिक झालेली आहे. त्यामुळे तिची व्याप्ती वाढलेली आहे.

रा. रं. बोराडे यांचा जन्म २५ डिसेंबर१९४० रोजी लातूर जिल्ह्यातील ‘काटगाव’ या छोट्याश्या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण पुढील शिक्षणासाठी गाव सोडले. माढा, बार्शी, सोलापूर, औरंगाबाद अशा शहरातून शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या निमिताने वास्तव्य नागरी भागात होते; तरी मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाने व तिथल्या ऋतूचक्राने घडविलेला पिंड घडवला. १९५७ साली आपली पहिली कथा प्रसिद्ध झाली. तेव्हा पासून हा लिहिता हात आज थांबला.१९६२ साली आलेल्या ‘पेरणी’ते‘ताळमेळ’, मळणी’,‘वाळवण’,‘राखण’,‘गोधळ’,‘माळरान’,‘बोळवण’,’वरात’,‘फजितवाडा’, ‘खोळंबा’,‘बुरुज’,‘नातीगोती’,‘हेलकावे’,‘कणसं आणि कडबा’ यासारख्या कथासंग्रहानी मराठवाड्यातील कष्टाची माणसे उभी राहिली. कष्टकऱ्यांच्या दु:खाला भाषिक आविष्कारातून सार्थ वाचा फोडणाऱ्या या लिखाणामुळे रा. रं. बोराडे यांची ओळख ग्रामीण साहित्यिक अशी झाली. याच काळात कांदबरी, नाट्य, विनोदी, समीक्षा आणि बालसाहित्य अशा बहुअंगी लेखनातून ग्रामसमुहातील माणसं त्यांनी उभी केली.

Story img Loader