अनेकजणी कपाळवर कुंकू नसणाऱ्या. निस्तेज डोळे, रापून गेलेले अंग. काहीजणी तरण्या. अंगावर पिणारे एखादे मूल. कृषी व्यवस्थेने ज्यांचा कर्ता पुरुष जीव नकोसा करून निघून गेला त्या सगळ्या एका रांगेत बसलेल्या. कोणाची जमीन दोन एकर, तर कोणाची पाच एकर. ‘कर्जाळू’ असा शब्द प्रयोग त्यांच्यासाठी करावा, अशा साऱ्याजणी. हातात ओळखीचा कागद घेऊन आलेल्या. ‘यांना समजून घ्यायला हवे, त्यांना जमेल तेवढी मदत करणे समंजस माणसाचे काम नाही का’, असा प्रश्न विचारत उभे असणारे सिनेक्षेत्रातील दोन संवेदनशील कलाकार नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. या दोन्ही कलाकारांनी सोमवारी जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील १३५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत केली. तेव्हा ते एकच सांगत होते, ‘आता सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन या संकटकाळात काम करायला हवे.’
मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांसाठी बीड, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्य़ांत आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांना मदत केल्यानंतर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्य़ांतील शेतकरी कुटुंबीयांना मदतीचे धनादेश या कलावंतांनी सुपूर्द केले. या वेळी त्यांनी दिलेला संदेश मात्र अधिक महत्त्वपूर्ण होता. ‘आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा.’ हे करू नका हे त्यांनी आवर्जून सांगितले. केलेली मदत तात्पुरत्या स्वरूपाची आहे. केवळ मलमपट्टी आहे. पण माझ्या बाजूने मी या कुटुंबीयांच्या बाजूने उभा आहे, हे सांगण्याचा त्यांनी तळमळीने प्रयत्न केला. बाका प्रसंग आल्यानंतर आम्ही लढणार, हा संदेश स्वीकारण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, अशी आधाराची गरज असते, असा विश्वास निर्माण करण्यासाठी मदत देत असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले.
तत्पूर्वी पत्रकार बैठकीत नाना पाटेकर यांनी या मदतीमागची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘या विधवा स्त्रियांचे पांढरे कपाळ पाहून गलबलून जायला होते. सरकार काय करेल, किती करेल, हे माहीत नाही. पण प्रत्येकाने जमेल तेवढे करावे या भूमिकेतून ही चळवळ उभारतो आहोत. खरे तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.’ या निमित्ताने अनेक लोक मदत करण्यासाठी तयार होत आहेत. एक लाख शेतकरी कुटुंबीयांचा विमा काढून देण्यास जुगलकिशोर तापडिया पुढे आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा चालविणाऱ्या कणके यांच्या संस्थेला मदत करण्यासाठी भावेश सराफ व चौधरीसारखी व्यक्ती तयार झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. मदत करणाऱ्या आणि मदतीसाठी तयार असणाऱ्या प्रत्येकाने या चळवळीत सहभागी व्हावे, असे सांगत येत्या काही दिवसांत मदतीसाठी एक फाऊंडेशनही सुरू करणार असल्याचे नाना पाटेकर म्हणाले.
शेतकऱ्यांची मागणी पाणी आणि वीज द्या, एवढीच आहे. ती मिळायला हवी. मात्र, सकारात्मक पाऊल म्हणून आपण काय करायचे, हे ठरवायला हवे, असे नाना म्हणाले. हाच धागा मकरंद अनासपुरे यांनीही पकडला. केवळ सामाजिक संकेतस्थळावर एकाने एक दुखरी कविता टाकायची आणि दुसऱ्याने त्याच्यावर दु:खी चेहऱ्याचा फोटो टाकायचा. हे किती दिवस करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, तेव्हा सारे सभागृहच स्तब्ध झाले. संत तुकाराम नाटय़गृहात झालेल्या या कार्यक्रमात अनेकांनी उत्स्फूर्तपणे नानांच्या हाती रक्कम सुपूर्द केली. त्याचा आकडा काही लाखात होता.
‘महिलांच्या हाताला काम द्यावे’
पावसाचे तीन महिने सोडले तर अन्य दिवसांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनीही सांगितले. अनासपुरे म्हणाले, अलीकडे आपले सण चिनी लोकांना माहीत झाले आहेत. ते आपल्याला पणत्या, पिचकाऱ्या पाठवतात. या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या महिलांना पणती बनविण्याचे किंवा पिशव्या बनविण्याचे काम आपण देऊ शकतो. त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे एक दालन शहरात उभारले तर तेथून खरेदी करावी, या साठीची जाहिरात आम्ही करू आणि आम्हीसुद्धा तेथूनच कपडे घेऊ. अनेक सकारात्मक उपक्रम या दोघांनी सुचविले. नकारात्मक प्रश्न, सरकारविरोधी रोषावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.
शेतकऱ्यांच्या दु:खावर संवेदनशीलतेने मदतीची फुंकर
‘यांना समजून घ्यायला हवे, त्यांना जमेल तेवढी मदत करणे समंजस माणसाचे काम नाही का.’
Written by बबन मिंडे
First published on: 08-09-2015 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensitive help on farmers problem