लातूर शहरातील वाहून जाणारे सांडपाणी पिण्यायोग्य बनविण्याचा दहा लाख लीटर क्षमतेचा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पाचे सादरीकरण उद्योजक राम भोगले यांनी केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प कशा पद्धतीने हाती घेता येईल, याची चाचपणी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना केली आहे. राज्य सरकारने आदेश दिल्यास मे महिन्यात प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतो, असे राम भोगले यांनी सांगितले.
औरंगाबाद शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनविण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. एमआयटी शैक्षणिक संकुलात हे पाणी वापरले जाते. तुलनेने कमी खर्चाचे तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त भागात आवश्यक असून, त्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नुकतेच करण्यात आले. शहरातील नाल्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते. गुजरातमध्ये असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याचा एक प्रयोग औरंगाबादमध्ये सुरू करण्यात आला. दुष्काळी लातूरमध्ये असा प्रयोग करता येईल, यासाठी नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे प्रयत्नशील होते. प्रकल्पास आवश्यक असणारी जागाही महापालिकेकडून दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकल्पास कसा प्रतिसाद देतात, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
केवळ लातूर नव्हे, तर पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प जालना येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने हाती घेतला जाणार आहे. जालना येथील सांडपाणी वाहून जाते. प्रक्रिया न करता पाणी दिल्याने आजार बळावू शकत असल्याने १ लाख लीटर पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग हाती घेतला जाणार आहे. कृषी विकास केंद्राचे विजय अण्णा बोराडे यांनीही या प्रकल्पास सकारात्मकता दाखवली आहे. पाण्याचा पुनर्वापर ही काळाची गरज असल्याने दोन ठिकाणी नवीन प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. राज्य सरकारने याबाबत योग्य पद्धतीने आदेश दिले तर लवकरच हे प्रकल्प उभारू, असे उद्योजक राम भोगले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा