छत्रपती संभाजीनगर : शिवसेना पक्ष व चिन्हाविषयीचा निर्णय घेताना केंद्र सरकारने ज्या पद्धतीने निवडणूक आयोगावर दबाव आणला होता तीच कार्यपद्धती वापरून राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही निर्णय होण्याची भीती आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाने नुकतीच आपणास नोटीस दिली असून, त्याचे उत्तरही निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्या (गुरुवारी) बीड येथे शरद पवार यांची सभा होणार आहे. दरम्यान, राज्यात अजित पवार गट शरद पवार यांचे छायाचित्र वापरून प्रचार करत असल्याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. पुणे येथील अजित पवार यांच्या बैठकीनंतर भूमिका स्पष्ट केलेली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कोठेही संभ्रम नाही.

आम्ही भाजपच्या विरोधात आहोत. या पक्षाच्या विरोधात जनमत घडविण्यासाठी सारे काही करू असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने काही वावगा निर्णय दिला, तरी त्याची तशी चिंता नाही. कारण आतापर्यंत १४ निवडणुका लढविल्या आहेत. बैलजोडी, गायवासरू, हात, चरखा आणि घडय़ाळ या चिन्हांवर निवडणूक लढवून निवडून आलो आहे. त्यामुळे चिन्हाची काळजी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांना वगळून शिवसेना व काँग्रेस त्यांचे स्वतंत्र नियोजन करत असल्याचे वृत्तही खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून तसे स्पष्टपणे सांगितले असल्याचेही त्यांनी सांगितले. २०२४ च्या निवडणुकीपूर्वीचे वातावरण मोदी सरकारला अनुकूल नसल्याचे दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधानांची परत येईनची प्रेरणा देवेंद्र फडणवीसांकडून

१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘मी पुन्हा परत येईन’ हे २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या वाक्याची प्रेरणा त्यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली असावी. फडणवीस म्हणाले तसे ते परतही आले; पण त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काय होईल माहीत नाही, असेही पवार तिरकसपणे म्हणाले.

धनंजय मुंडे यांना टोला

बीड येथे शरद पवार यांच्या सभेबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सभा होणार आहे. अशी सभा घेण्याचा त्यांना अधिकार आहे. पण ज्या जिल्ह्यात ते सभा घेत आहेत. त्या जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत एका महिलेने केलेल्या आरोपाचा इतिहासही ते जमलेल्या लोकांना आवर्जून सांगतील, असे म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar statement after the commission notice that he is afraid of the same decision as shiv sena regarding ncp amy