महात्मा गांधी मिशनच्या संगीत अकादमीच्या वतीने घेण्यात येणारा शारंगदेव महोत्सव १५ ते १७ जानेवारीदरम्यान होणार आहे. तीन दिवसीय संगीत व नृत्य महोत्सवात भारतीय अभिजात संगीतावर विविध कार्यक्रम होणार आहेत. नृत्य-संगीताचा हा महोत्सव औरंगाबादकरांसाठी पर्वणीच असते. गेल्या ५ वर्षांपासून हा महोत्सव सुरू आहे. सकाळच्या सत्रात कार्यशाळा व सायंकाळी साडेसहा ते साडेनऊपर्यंत कथक, ओडिसी नृत्याचे सादरीकरण होणार आहे. वेरुळ लेणी शिल्पावर आधारित ओडिसी नृत्याचे सादरीकरण, महागामीचा समूह आणि पद्मभूषण तीजन बाई या पंडवाणी नृत्य संरचना सादर करणार आहेत.
तेराव्या शतकातील ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथाचा आधार िहदुस्थानी व कर्नाटक संगीतात घेतला जातो. सात अध्यायांत विभागला गेलेला ग्रंथ शारंगदेव यांनी लिहिलेला आहे. यादव राजा सिंघानच्या दरबारात ते कार्यरत होते. दोन्ही संगीत परंपरांना जोडणारा हा महोत्सव या वर्षी अधिक बहारदार होईल, असे महात्मा गांधी संगीत अकादमीच्या संचालक पार्वती दत्ता यांनी सांगितले. या वर्षी महोत्सवात ओडिसी संगीत यावर कार्यशाळा होणार असून सायंकाळी सतीश कृष्णमूर्ती व समूह कर्नाटक तालवाद्याचा कार्यक्रम सादर करतील. कोलकाता येथील मालबिका मित्रा आणि समूह कथक नृत्य सादर करणार आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात संगीत रत्नाकराचे प्रबंध, ध्रुपद यावर चर्चा होणार आहे. शनिवारी (दि. १६) पार्वती दत्ता व महागामीतील विद्यार्थी कथक नृत्य सादर करणार आहेत. महोत्सवात भारतातील दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.
पद्मभूषण सी. व्ही. चंद्रशेखर यांना शारंगदेव सन्मान
भारतीय पारंपरिक कलाक्षेत्राशी संबंधित महान गुरू आणि संशोधक असणाऱ्यांना ‘शारंगदेव सन्मान’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. या वर्षी पद्मभूषण सी. व्ही. चंद्रशेखर यांना हा सन्मान दिला जाणार आहे. चंद्रशेखर हे भारतातील वरिष्ठतम भरतनाटय़-नृत्यकार आहेत. त्यांनी भरतनाटय़ाची साधना भारतातील सर्वश्रेष्ठ अशा चेन्नईस्थित कलाक्षेत्र संस्थान येथे श्रीमती रुक्मीणदेवी अरुण्डेल यांच्याकडे पूर्ण केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा