शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांच्यावर खोचक टीका केली. ‘बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला’ या अंबादास दानवेंच्या टीकेला संजय शिरसाटांनी दोन वाक्यात उत्तर दिलं. ते गुरुवारी (५ जानेवारी) औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
“छोटे मिया, बडे मिया” या अंबादास दानवेंच्या टीकेवर संजय शिरसाट म्हणाले, “अंबादास दानवेंना आणखी राजकारण कळायचं आहे. ते बोलले त्यात एवढं विशेष काहीच नाही.”
“संजय राऊतांना इतकं महत्त्व देऊ नका”
संजय शिरसाटांनी संजय राऊतांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “संजय राऊत नेहमीप्रमाणे त्यांचं मत मांडत असतात. त्याला इतकं महत्त्व देऊ नका. योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले. त्यामुळे त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. उद्योग पळवले जात नाहीत. उद्योग उचलून घेऊन गेले असं कधी होत नाही. प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्यात उद्योग यावा म्हणून प्रयत्नशील असतो.”
व्हिडीओ पाहा :
“योगींवर टीका करण्याचं कारण नाही”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये येत आहेत. इथंही काही करार होणार आहेत. जो तो मुख्यमंत्री आपल्या राज्याचं हित पाहतो. म्हणून त्यावर टीका करण्याचं कारण नाही. त्यांनी रोड शो केला म्हणून वाईट वाटण्याचं कारण नाही,” असं म्हणत संजय शिरसाटांनी योगी आदित्यनाथ यांची पाठराखण केली.
हेही वाचा : VIDEO: “…तेव्हा संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील”, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
अंबादास दानवे काय म्हणाले होते?
शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीतील चर्चा बाहेर जात असल्याचा आरोप केला होता. यानंतर शिंदे गटातच मतभेद असल्याचे समोर आले. यानंतर अंबादास दानवेंनी अब्दुल सत्तारांनाच अशा प्रकारच्या चर्चा बाहेर करण्याची सवय असल्याचा आरोप केला. यावेळी दानवेंनी संजय शिरसाटांचा मुलगा सिद्धात शिरसाठ यांच्यावर टोला लगावत ‘बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला’, अशी खोचक प्रतिक्रिया दिली.