औरंगाबाद : शिवसेना नगरसेवक आत्माराम माणिकराव पवार यांच्यावर मंगळवारी सकाळी चार ते पाचजणांनी हल्ला केला. यात एकाकडे असलेल्या चाकू हल्ल्याने पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक सेना नेत्यांनी रुग्णालयात जाऊन आत्माराम पवार यांची भेट घेतली.
शहरातील गारखेडा भागातील पुंडलिकनगर परिसरात हनुमानगर येथे शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार राहतात. पवार हे पुंडलिकनगर भागातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पवार हे आपल्या घरासमोर उभे होते. त्यावेळी आलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी पवार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. धक्काबुक्कीही केली. हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्या हातातील चाकूने पवार यांच्यावर हल्ला केला. यावेळीच्या आरडा-ओरडीने पवार यांचे कुटुंबीय घरातून धावून आले. परंतु तोपर्यंत हल्लेखोर वाहनाने पसार झाले. जखमी पवार यांना तातडीने नजीकच्या सिग्मा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना देण्यात आली. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मीकांत शिनगारे, जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे, मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नाथा जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून हल्लेखोरांचा माग काढण्याचे काम पोलीस करीत होते. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, आत्माराम पवार यांच्यावरील हल्ल्याची माहिती कळताच शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरै यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. पवार यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती काही कार्यकर्त्यांनी व निकटवर्तीयांनी दिली आहे.
रात्री वाद झाला होता
नगरसेवक आत्माराम पवार यांचा गल्लीतील दोन तरुणांशी वाद झाला होता. यातील एकाला हल्ला केल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या दोघांशी झालेल्या वादातून सोमवारी रात्री पवार यांच्या घरावर दगडफेकही झाल्याचे काहींनी सांगितले. घटनेनंतर पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती आहे.