पालकमंत्री व खासदार आमनेसामने
अन्य पक्षांच्या तुलनेत मराठवाडय़ात शिवसेना राजकीयदृष्टय़ा आघाडीवर असताना औरंगाबादपाठोपाठ परभणीमध्ये पालकमंत्री विरुद्ध खासदार हा वाद चव्हाटय़ावर आला आहे. परभणीचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्यावर खासदार संजय जाधव यांनी तोफ डागल्याने ‘मातोश्री’च्या पाठिंब्यावर दादागिरी करणाऱ्या रावते हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
मराठवाडय़ातील शिवसेनेमध्ये खासदार विरुद्ध पालकमंत्री असा संघर्ष नवीन नाही. औरंगाबादमध्ये पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार खरे यांच्यामधील वैर सर्वश्रुत आहे. त्यात आता परभणीची भर पडली आहे. खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्यावर जाहीर टीका केल्यामुळे मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. पक्ष संघटनेत जेथे जेथे नियुक्ती होते तेथे दिवाकर रावते हे वादग्रस्त ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. मराठवाडय़ातील काही शिवसैनिकांनी मागे ‘रावते हटाव’चा नारा दिला होता. जनाधार नसलेल्या या नेत्याकडून लोकप्रतिनिधींचा नेहमीच अपमान केला जातो, असे शिवसेनेत बोलले जाते.
उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड हे शिवसैनिकांच्या संपर्कात नसल्याने त्यांचे कोणाशी वाद होण्याची शक्यता नाही. मराठवाडय़ातील अन्य जिल्हय़ातही चित्र फारसे वेगळे नाही.
औरंगाबादच्या शिवसेनेत खासदार खरे विरुद्ध इतर सर्व असे चित्र नेहमी पहावयास मिळते. कार्यक्रम कोणताही असो, महापालिकेतून खरे यांच्या भूमिकेला नेहमी विरोध होतो. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते नको असणाऱ्या गोष्टी लादतात. समांतर पाणीप्रश्नी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची कोंडी झाली होती. पदाधिकारी कार्यकर्ते पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे लहानसहान तक्रारी करतात. त्या ते सोडवितात. त्यामुळे रामदास कदम यांना चांगला मान मिळतो. तो खरे यांना हवा असतो. त्यामुळे जेव्हा शक्य असते तेव्हा कुरघोडी सुरू असते.
रामदास कदम यांचे दुखणे वेगळे आहे. त्यांना रत्नागिरी या त्यांच्या मूळ जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रिपदात रस होता. पण ‘मातोश्री’चे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांच्याकडे रत्नागिरीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने कॅबिनेट मंत्री असूनही दूर औरंगाबादमध्ये जावे लागल्याने कदम थोडे नाराजच होते. त्यातच खासदार खैरे आपले ऐकत नाही याचे त्यांना शल्य होते. यातूनच मग रामदासभाईंनी औरंगाबादच्या राजकारणावर आपला पगडा राहील यावर भर दिला.
परभणी, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या तीन जिल्हय़ांत शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळते. लातूर, बीड या जिल्हय़ात शिवसेनेचा तसा प्रभाव नाही. भाजपमध्येही अशीच स्थिती आहे. जालना जिल्हय़ाचे पालकमंत्री बबन लोणीकर आणि खासदार तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामध्येही फारसे पटत नाही. अनेक जाहीर कार्यक्रमांना ते दांडय़ा मारत असतात. प्रदेशाध्यक्षांचे पालकमंत्र्यांवर बारीक लक्ष असते. आगामी मंत्रिमंडळात विस्तारात लोणीकर यांना डच्चू देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पालकमंत्री विरुद्ध खासदार
लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे तसा पुरेसा वेळच देत नाहीत, अशी लातूरकरांची तक्रार असते. त्यामुळे खासदार सुनील गायकवाड आणि पंकजा मुंडे यांचे मतभेद असे नाहीत. मात्र, ते सामंजस्याने एकत्रित येऊन महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करतात, असेही चित्र नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मराठवाडय़ात पालकमंत्री खासदारांना किंमत देत नाहीत. खासदार जाधव यांचे वक्तव्य यामुळेच असावे असे मानले जात आहे. बीडमध्ये मात्र पालकमंत्री आणि खासदार दोघी बहिणी असल्याने त्यांचे तेवढे बरे चालले आहे. हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव आणि पालकमंत्री दिलीप कांबळे हे दोघेही वेगळ्या पक्षांचे असल्याने त्यांच्यात समन्वय असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मराठवाडय़ातील शिवसेनेमध्ये खासदार विरुद्ध पालकमंत्री असा संघर्ष नवीन नाही. औरंगाबादमध्ये पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार खरे यांच्यामधील वैर सर्वश्रुत आहे. त्यात आता परभणीची भर पडली आहे. खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्यावर जाहीर टीका केल्यामुळे मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत.ोक्ष संघटनेत जेथे जेथे नियुक्ती होते तेथे दिवाकर रावते हे वादग्रस्त ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. मराठवाडय़ातील काही शिवसैनिकांनी मागे ‘रावते हटाव’चा नारा दिला होता. जनाधार नसलेल्या या नेत्याकडून लोकप्रतिनिधींचा नेहमीच अपमान केला जातो, असे शिवसेनेत बोलले जाते.