छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात गळती लागलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने पुकारलेल्या ‘लबाडांनो पाणी द्या’ आंदोलनात शहरातील चार चौकांत पाच – सात कोरड्या घागरीचे तोरण आणि फार तर ५० कार्यकर्ते असे स्वरूप दिसून आले. ‘लबाडांनो पाणी द्या’ असे फलक असणाऱ्या दोरीला घागरी बांधून शिवसेनेकडून विस्कटलेल्या संघटनेत पुन्हा चेतना भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे या दोघांनी वेगवेगळ्या चौकात आंदोलनात नेतृत्व केले.

छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना गेल्या २० वर्षांपासून रखडली आहे. चंद्रकांत खैरे खासदार असताना मंजूर योजना ७९१ कोटी रुपयांची पीपीपी तत्वावरील ‘समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. पुढे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेतील अनेक घोळ लक्षात आल्यानंतर ही योजना रद्द करण्यात आली.

पुढे १६८० कोटी रुपयांची योजना आधी भाजपने मंजूर केली. तेव्हा आमदार अतुल सावे यांनी पुढाकार घेतला. नंतर युतीमध्ये फूट पडून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेला स्थगिती देऊन शिवसेनेने पुन्हा तीच योजना मंजूर केली. पुढे यात २४ तास पाणी देऊ, असे आश्वासन देत योजनेची किंमत २७५० कोटी रुपये करण्यात आली. पण जुनी जीर्ण झालेली योजना आता फुटते. तात्पुरत्या योजनाही फारशा सक्षमपणे काम करत नसल्याने या उन्हाळ्यात शहरात काही भागांत १२ ते १५ दिवसा एकदा कसेबसे पाणी येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेकडून आंदोलन हाती घेण्यात आले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी सकाळी जालना रोडवरील मुकुंदवाडीत आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरच पण वाहतुकीचा मार्ग न अडवता हे आंदोलन करण्यात आले. ‘लबाडांनो पाणी द्या’ अशा घोषणा देत आणि कागदी हंड्यांची माळ मुकुंदवाडीतील लोखंडी पुलाला लटकावत त्याखाली जेमतेम पाच-पन्नासच्या संख्येने काही पुरुष कार्यकर्ते व मोजक्या महिला कार्यकर्तींच्या उपस्थितीत हे आंदोलन १५ ते २० मिनिटे चालले.

आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, या शहरातील नागरिकांना पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. पाणी असूनही ही परिस्थिती आहे. जलवाहिनीचे काम सुरू होऊन तीन वर्षे झाली असून, त्यानंतरही काम अर्धवट आहे. पाण्याच्या अडचणीमुळे तरुणांचे लग्न जुळत नसून, कोणाचे लग्न जुळले आहेत, त्यांच्यासाठी तारखा काढण्याचा पेच तयार झाला आहे. या शहराचे अभियंते सक्षम असून, आज मुख्यमंत्र्यांना आंदोलनाची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवावे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, प्रशासनातील अधिकाऱ्यांशीही बोलावे, असेही दानवे म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांनी बाबा पेट्रोल पंपाजवळ आंदोलन केले. वरच्या पुलास पाच प्लास्टीकच्या घागरीचे तोरण बांधण्यात आले. यामुळे पाच घागरी आणि पन्नास शिवसैनिक असेच चित्र होते. पोलिसांचा मात्र तगडा बंदाेबस्त होता.

पाणी टंचाईला शिवसेनाच जबाबदार – बावनकुळे

आम्ही शहरासाठी पाणी योजना मंजूर केली. डिसेंबरपर्यंत चाचणी पूर्ण होईल. आता काही लोकांना आंदोलनाची सवय झालेली असते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे एकदा तरी पाण्यावर बोलले का, हा प्रश्न नक्की सुटेल, विश्वास ठेवा, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या योजना बंद केल्या. त्या आम्ही सुरू केल्या आहेत. पुढील उन्हाळ्यात एवढी पाणी टंचाई नसेल, असेही बावनकुळे म्हणाले.