BJP Workers vs Shivsena Thackeray Group : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे बघायला मिळालं आहे. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. आदित्य ठाकरे राहत असलेल्या हॉटेलबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले.
पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
परिस्थितीचं गांभीर्य बघता पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. महत्त्वाचे म्हणजे घटनेची माहिती मिळतात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी पोहोचत भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली.
या परिस्थितीला पोलीस जबाबदार- अंबादास दानवे
दरम्यान, या घटनेबाबत अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “या परिस्थितीला पोलीस जबाबदार आहेत. त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती, जी त्यांनी घेतली नाही. यासंदर्भात मी काल रात्री पोलीस आयुक्तांना फोन केला होता. मात्र, तरीही त्यांनी दखल घेतली नाही, असे ते म्हणाले. तसेच पोलिसांनी केवळ शिवसेनेच्या ( ठाकरे गट) कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पोलीस भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नाही”, असा आरोपही त्यांनी केला.
म्हणून भाजपा कार्यर्त्यांकडून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध?
विशेष म्हणजे काल पंतप्रधान मोदी हे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी त्यांचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होतं. त्याचा बदला म्हणूनच आज भाजपा कार्यर्त्यांकडून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd