आयुक्तांवर अविश्वास ठराव संमत झाल्याने रामदास कदम यांची सरशी
शिवसेनेत खासदार चंद्रकांत खैरे आता एकाकी पडल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आयुक्तांवर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने खैरेंची अवस्था हतबल लोकप्रतिनिधी अशी झाली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम व खासदार खैरे यांच्या वादात शहरातील नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर आयुक्त हटाव मोहिमेला पालकमंत्र्यांनी वेग दिला. महापालिकेच्या या निर्णयात खासदार खैरे यांनी पक्षप्रमुखांना शब्द टाकूनही फारसा उपयोग झाला नसल्याने ते शिवसेनेत एकाकी पडले आहेत.
महापालिका निवडणुकीपासूनच खैरे यांच्या शब्दाला शिवसेनेत फारशी किंमत दिली जात नसल्याची भावना बळावली होती. त्यांच्या एकूण कारभाराबाबत नगरसेवकांमध्ये नाराजी होती. परिणामी, पालकमंत्री कदम यांच्याकडे पालिकेची सूत्रे देण्यात आली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्य़ात पक्षसंघटनेवर वर्चस्व मिळवले. या कालावधीत खैरे यांना फारसे काही करता आले नाही. आयुक्त हटावच्या राजकीय घडामोडींच्या निमित्ताने त्यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षाकडून एकाकी टाकण्याची प्रक्रिया आहे असे वाटत नाही, मात्र आपली जनता सुज्ञ आहे. पालकमंत्री मोठे आहेत असे तिरकस विधान त्यांनी केले. पक्षप्रमुखांचा आपणावर विश्वास आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
खैरे यांच्या राजकीय आलेखाची मांडणी करताना राजकीय विश्लेषक जयदेव डोळे म्हणाले, की त्यांना खासदार शिवराज पाटील चाकूरकरांचा आदर्श घेता आला नाही. स्थानिक पातळीवरील समस्या हा माझ्या कामकाजाचा भाग नाही, असे त्यांना स्पष्ट सांगता आले नाही. खासदार, पण महापालिकेतच अडकून पडतो अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यांना कोणतीही मोठी संस्था उभी करता आली नाही. वैचारिक व बौद्धिक पातळीही नगरसेवकांसारखीच ठेवल्याने खासदार नगरसेवकांसारखा वागत असल्याचे चित्र सर्वत्र होते. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या शक्तिस्थळावर हल्ले झाले. ते मोडीत निघाले आहेत. पाच वेळा निवडून येऊनही नेतृत्वाला आवश्यक असणारे राष्ट्रीयत्व त्यांना मिळवता आले नाही, हे चित्र दिसून येत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा