सुहास सरदेशमुख
एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडे प्रभू रामचंद्रांची हातात धनुष्य घेतलेली मूर्ती व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला. या दोन्ही मूर्तीच्या मध्यभागी उभे राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपकडून पूर्वी प्रचारात जाणारे मुद्दे शिवसेनेसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समान नागरी कायदा, काश्मीरमधील ३७०वे कलम आणि राममंदिर हे तीनही मुद्दे आता शिवसेनेने हाती घेतले असल्याचा संदेश गटप्रमुखांपर्यंत दिला. ज्या दोन जिल्ह्य़ांत शिवसेनेचा जीव तोळामासा आहे तेथे म्हणजे लातूर, बीड आणि औरंगाबादसारख्या बालेकिल्ल्यातही उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा प्रमुख मुद्दा राममंदिर होता. यानिमित्ताने भाजप व त्यांच्या नेत्यांवर टीका करत ठाकरे यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली.
‘अच्छे दिन आयेंगे’ ही लोकसभा निवडणूकपूर्वीची घोषणा आणि भाजपकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवर केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केलेली वक्तव्ये निर्लज्ज आणि कोडगेपणाची असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. स्पष्टवक्तेपणा आणि कोडगेपणा यातला फरकही त्यांनी कार्यकर्त्यांना नीटपणे समजावून सांगितला. तो पटण्यासारखाही होता. ‘आम्ही सत्तेत येऊ असे आम्हाला वाटत नव्हते. जबाबदारी येणारच नाही असे वाटत असल्यामुळे आश्वासने द्या असे आम्हाला लोक सांगत होते आणि आम्ही ती देत होतो’ असे गडकरी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले होते. त्या वक्तव्यांचा समाचार ठाकरे यांनी घेतला. मात्र, गडकरींवरील या टीकेमागे आणखी एक कंगोरा असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. लोकसभेत युती करायची असेल तर महाराष्ट्रातल्या मातब्बर नेत्यांनी केंद्रात शिवसेनेची बाजू उचलून धरायला हवी, असे वाटणे स्वाभाविक आहे. गडकरी हे या कामासाठी योग्य व्यक्ती असल्यामुळे त्यांनी पुढाकार घ्यावा, असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटते. ते युती घडविण्यासाठी पुढाकार घेत नाहीत, ही सल ठाकरे यांच्या मनात असेल म्हणूनही त्यांच्यावर टीका होत असावी. भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले की, वक्तव्यांचा विपर्यास करून केलेली टीका अशोभनीय आहे. मुद्दय़ांची पळवापळव हा विषय नाही. कोणता पक्ष कोणत्या मुद्दय़ासाठी आग्रही आहे, हे जनतेला माहीत आहे.
हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखरपणे मांडतो आहोत, हा संदेश देत उद्धव ठाकरे यांनी मराठवाडय़ाचा दौरा केला. दुष्काळाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नावरही त्यांनी टीकेचा सूर लावला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रखर टीका आणि राज्य सरकारला टोमणे अशी त्यांच्या भाषणाची धाटणी होती. भाजपने जे मुद्दे मागच्या बाकावर ठेवले आहेत, ते शिवसेना हातात घेईल, असा संदेश देत मराठवाडय़ाच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी दोन कमकुवत मतदारसंघात बांधणी करण्याचा प्रयत्न केला. लातूर जिल्ह्य़ात फक्त औसा तालुक्यात अधूनमधून शिवसैनिक दिसायचे. बीड जिल्ह्य़ात तर या पक्षाचे तसे अस्तित्व नव्हते. मात्र, गेल्या सहा महिन्यांत खासदार चंद्रकांत खैरे यांनी या दोन्ही जिल्ह्य़ांत मेळावे घेतले. औरंगाबाद जिल्ह्य़ात शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदेत सत्ता असूनही सेनेविषयीची सहानुभूती ही केवळ ‘हिंदू’ प्रतिमेशी जोडलेली असावी, असा प्रयत्न लोकसभा निवडणुकीपूर्वी पद्धतशीरपणे केला जात आहे. त्याचा जोर स्थानिक पातळीवरही वाढविला जात आहे. यामुळेच मुख्यमंत्र्यांवर टीका करत खासदार खैरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशी टाळाटाळ करत आहेत, हे आवर्जून सांगितले. ‘सब का साथ सब का विकास’ असा मुद्दा भाजपने घेतला असल्यामुळे कडव्या हिंदुत्वाचे प्रचार मुद्दे शिवसेना भाजपकडून पळवून नेत असल्याचे चित्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात दिसून आले.