जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत अनेक ठिकाणी विशेषत: भोकर विधानसभा क्षेत्रात धक्कादायक निकाल लागले. संसद आदर्श ग्राम योजनेतील रोही पिंपळगावच्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, तर मालेगाव, कोंढा येथे ग्रामस्थांनी प्रस्थापितांना नाकारले. उमरी तालुक्यातील कुदळा येथे राष्ट्रवादीच्या गोरठेकर गटाला घाव बसला; पण तळेगाव ग्रामपंचायतीत या गटाने याचा वचपा काढला. बारडची सत्ता शंकरराव बारडकर व त्यांच्या धाकटय़ा पुत्राने आपल्या हाती आणली. कंधार तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीवर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सेनेचा झेंडा फडकावला.
नांदेड तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा तिरंगा फडकल्याचा दावा पक्षाचे आमदार डी. पी. सावंत यांनी केला. मात्र, शहरालगत असलेल्या पावडेवाडीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. विद्यमान सरपंच अर्चना पावडे यांना पराभूत करण्याची किमया विरोधकांनी केली. घुंगराळा (तालुका नायगाव) येथे युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत संभाजी सुगावे स्वत: विजयी झाले, तसेच त्यांनी ग्रामपंचायतही ताब्यात घेतली; मात्र, असे यश कोंढा (तालुका अर्धापूर) येथे युवक काँग्रेसचे लोकसभाध्यक्ष तिरुपती ऊर्फ पप्पू कोंढेकर यांना मिळाले नाही. तेथे खासदार अशोक चव्हाण यांना मानणाऱ्या प्रतिस्पर्धी गटाला यश मिळाले. या गटाला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचेही कृपाछत्र होते. शेजारच्या मालेगावमध्ये मतदारांनी केशवराव-माणिकराव व इतरांच्या युतीला फटकारले.
मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव हे गाव खासदार चव्हाण यांनी संसद आदर्श ग्राम योजनेत निवडले असून तेथे भरपूर निधी देत कामांना सुरुवात केली; पण या गावात मुसंडी मारत शिवसेनेने १३ पैकी ११ जागा जिंकल्या. गतवर्षी या गावातील ऊस नेण्याबाबत गणपतभाऊ तिडके यांनी आडमुठी भूमिका घेतली होती. याच गणपतभाऊंना देगाव ग्रामपंचायतीत बहुमत आणता आले नाही. भोकर मतदारसंघातील काही ग्रामपंचायतींमध्ये ‘भाऊराव चव्हाण’च्या कारभारावरील नाराजी उघडपणे व्यक्त झाली.
मालेगाव ग्रामपंचायतीत डॉ. लक्ष्मण इंगोले यांनी एकहाती, निर्भेळ यश मिळवत प्रस्थापितांना धक्का दिला. १५ पैकी १० जागा त्यांच्या गटाला मिळाल्या. सविता इंगोले यांनी विजय संपादन केल्याने त्यांचे सरपंचपद नक्की झाले. भोकर तालुक्यात काँग्रेसच्या मारुतराव बल्लाळकरांना पराभवाचा धक्का बसला. लगळूदमध्ये भाजपच्या किशोर लगळूदकर यांनी बहुमत मिळवले; पण बटाळा (किन्हाळा) ग्रामपंचायतीत किन्हाळकर गटाला हादरा बसला. लक्षवेधी भोसी ग्रामपंचायतीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश भोसीकर यांनी ‘स्मार्टमॅन’ प्रकाश भोसीकर गटाचा धुव्वा उडवला. पत्रकार रामचंद्र मुसळे यांनी थेरबन ग्रामपंचायतीत आपली सत्ता आणली.
मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे भाऊसाहेब-राजन देशपांडे गटाच्या हातून ग्रामपंचायतीची सत्ता निसटली. देगलूरच्या अंतापूर ग्रामपंचायतीत माजी आमदारांच्या सौभाग्यवती विजयी झाल्या; पण तेथे काँग्रेसचा पराभव झाला. मुक्रमाबादेत गोजेगावकर गटाला पराभवाचा धक्का बसला. या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाल्याचा दावा जि. प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी केला.
लोहा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीत माजी सभापती रुस्तुम धुळगंडे यांच्या पॅनेलला मतदारांनी नाकारले. येथे ११ पैकी केवळ ४ जागा या पॅनेलला मिळाल्या, तर नवख्यांनी बहुमत प्रस्थापित केले. खडकमांजरी गावी चुरशीच्या निवडणुकीत पांडुरंग चौगुले व खुशाल होळगे यांच्या पॅनेलने विरोधकांना धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. कापसीमध्ये जि.प.चे माजी सदस्य बालाजी वैजळे गटाला मतदारांनी पराभवाचा धक्का दिला. तेथून ते एकमेव विजयी झाले. ११ पैकी १० जागांवर विरोधी गटाचे उमेदवार निवडून आले.
नायगाव तालुक्यातील धुप्पा ग्रामपंचायतीत ९पैकी ६ जागा जिंकत भाजपच्या अवकाश पाटील धुप्पेकर यांच्या पॅनेलने विजय मिळवला. येथे प्रस्थापित व तालुक्यातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे मोहन पाटील धुप्पेकर गटाचा पराभव झाला. कुंटूर येथे माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांच्या गटाने १३ पैकी ७ जागा आधीच बिनविरोध निवडून आणल्या. उर्वरित ६ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. देगलूरमध्ये खानापूर येथे अनिल पाटील खानापूरकर-ताडकोले गटाला नव्या गटाने पराभूत केले. सूतगिरणीची वाताहत केल्याचा फटका प्रस्थापितांना बसला. हाणामारीमुळे गाजलेल्या कोटग्याळमध्ये गोजेगावकर गटाची सरशी झाली. या गटाला सर्व जागा मिळाल्या. बहाद्दरपुरा (तालुका कंधार) येथे धोंडगे बंधूंच्या पॅनेलने बहुमत प्राप्त केले. याच तालुक्यातील पेठवडज ग्रामपंचायतीत मोरेश्वर जोशी यांच्या नेतृत्वाखाली गटाने १७ पैकी १० जागा मिळवत मोठे यश प्राप्त केले. त्यांनी शिवसेनेच्या भालचंद्र नाईक व शिवाजी नाईक यांच्या गटाचा पराभव केला.

Story img Loader