छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड येथील सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) छगन उत्तमराव पाटील याच्याकडे १ कोटी ८० लाख ८० हजार १५५ रुपयांची अपसंपदा आढळून आली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या तक्रारीवरून छगन पाटील व त्याची पत्नी वंदना पाटील यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लोड येथील कार्यालयात सहदुय्यम पदावर असलेला छगन उत्तमराव पाटील याच्याविरुद्ध लाच प्रकरणात २ मार्च रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली होती. यामध्ये दाखल गुन्हयाचे अनुषंगाने छगन पाटीलच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.
हेही वाचा…भरधाव एचपी गॅसच्या ट्रकने ज्येष्ठ दाम्पत्याला उडवले; आकाशवाणी चौकातील घटना, महिलेचा मृत्यू
छगन पाटीलच्या सेवा कालावधीदरम्यान भ्रष्ट व गैरमार्गाने, कायदेशिर ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी, १ कोटी ८० लाख ८० हजार १५५ रुपये रक्कमेची मालमत्ता संपादित केल्याचे आढळून आले असून त्यांची टक्केवारी वजा २८४.४५ टक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच वंदना छगन पाटील यांनी संबंधित मालमत्ता संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.