छत्रपती संभाजीनगर – पंजाबमधील फिरोजपूर येथील तिहेरी हत्याकांडाशी संबंधित सहा आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. पहाटे ३ वाजता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना पंजाब पोलीस विभागाचे संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कृती दल (एजीटीएफ – ॲण्टी गॅंगस्टर टास्क फोर्स) अतिरिक्त महासंचालक प्रमोद बान यांचा फोन आला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मदत मागितली.
फिरोजपूर येथे लग्न अवघ्या काही दिवसांवर आलेल्या एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणातील सहा आरोपी नांदेडहून निघून समृद्धी महामार्गाने पुढे जात असल्याचे बान यांनी पोलीस आयुक्त पवार यांना सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली १० अधिकारी आणि ४० कर्मचाऱ्यांचा ताफा तयार करून शस्त्रास्त्रासह जात असलेल्या सहाही आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतल्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सांगितले. पंजाब पोलीस दलातील फिरोजपूर येथील उपअधीक्षक राजन परमिंदरसिंग हे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असल्याचीही माहिती पोलिसांकडून मिळाली.
हेही वाचा – अहमदनगर : भंडारदरा पाणलोटातील घाटघरला आजपर्यंत पडला ५ हजार ३८ मिमी पाऊस
अक्षयकुमार उर्फ बच्छा बलवीरसिंग, गुरुप्रित दर्शनसिंग गोपी, दिलेरसिंग मनिंदर चिवनसिंग, प्रिन्स काका संधू, सुखचैनसिंग गब्बरसिंग जास, रवींद्रसिंग करणेलसिंग सुख, अशी सहा आरोपींची नावे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.
प्रकरण नेमके काय ?
फिरोजपूर शहरात ३ सप्टेंबर रोजी ९ आरोपींनी भरदिवसा भरवस्तीतील गुरुद्वारासमोरील एका वाहनात बसलेल्या फिर्यादींच्या वाहनावर अंधाधुंद गोळीबार केला. यात दिलदीप सिंग, आकाश दिपसिंग व जसप्रित कौर यांचा मृत्यू झाला. यातील जसप्रित कौर हिचा विवाह अवघ्या दहा दिवसांवर आलेला होता.