कोणत्याही प्रकारच्या बंदीमुळे समस्यांचे निराकरण होत नाही. मग प्रश्न उसाचा असो किंवा अन्य कोणताही. दुष्काळी स्थितीत ऊस जास्त पाणी पिणारे पीक वाटत असेल, तर त्यावर ठिबक सिंचन हे उत्तर आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
मराठवाडय़ातील साखर कारखान्यांची संख्या आणि त्याला लागणारे पाणी यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. मराठवाडय़ात साखर कारखाने चालविणारे बहुतांश नेते राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यामुळे मराठवाडय़ातून ऊस हद्दपार करण्याच्या भूमिकेवर सुळे काय बोलतात, या विषयी उत्सुकता होती. कोणत्याही बंदीनंतर यंत्रणेतील काही जणांच्या हाती अधिक ताकद येते. त्याचा योग्य उपयोग होतोच असे नाही. त्यामुळे कोणत्याही बंदीपेक्षा त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना शोधल्या गेल्या पाहिजेत. उसासाठी ठिबकची उपाययोजना करता येईल. आम्ही आमच्या मतदारसंघात त्याचा वापर करतो, असे सुळे म्हणाल्या.
मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त भागात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढतो आहे. पूर्वी आत्महत्या झाली, की विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस हे सरकारवर ३०२चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करायचे. आता ती मागणी आम्ही करायची का? मुळात शेतकऱ्यांची पत वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती हा उपाय आहे. त्याचबरोबर राज्यातील दुष्काळी भागासाठी स्वतंत्र कर्जधोरण ठरविण्याची गरज आहे. मागेल त्याला शेततळे असे एका योजनेचे नाव आहे. खरेच प्रत्येकाला मिळेल का तळे? ५० हजार रुपयांत तळे होते का, असा सवालही त्यांनी केला.
औरंगाबाद येथील मद्यनिर्मिती कारखान्यांना पाणी द्यावे की नाही यावरून सुरू असणाऱ्या वादाबाबत प्रतिक्रिया विचारली असता सुळे म्हणाल्या, की हे काम त्या जिल्ह्य़ातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आहे. प्रत्येक वादात प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. मात्र, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यायला हवे. या भागातून काही महिन्यांसाठी दारूविक्रीवर र्निबध घालता येतील का, या विषयीचा प्रयोग सरकारने हाती घ्यायला हरकत नाही. मात्र, कोणत्याही स्वरूपाची बंदी ही काही उपाययोजना ठरू शकत नाही.
मिनी बसमधून दौरा
धुरळा उडवत जाणारा गाडय़ांचा ताफा आणि कार्यकर्त्यांच्या झुंडी असे दुष्काळी भागात दिसणारे चित्र नेहमीच बघायला मिळते. सुप्रिया सुळे यांचा दौरा मात्र आज मिनी बसमधून झाला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी मंत्री फौजिया खान, नीलेश राऊत आदी नेतेमंडळी एकाच गाडीतून दौऱ्यावर आली. गाडय़ांची संख्या कमी करा, अशा सूचना खासदार सुळे आवर्जून देत होत्या. तुलनेने कमी गाडय़ांच्या ताफ्यात त्यांनी केलेल्या या दौऱ्यात औरंगाबाद जिल्ह्य़ातील चित्ते नदी पुनरुज्जीवन कामाची त्यांनी पाहणी केली.

Story img Loader