ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘मराठवाडय़ाचा युवावक्ता’ आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी गुरुवारी (दि. १४) होणार आहे. देवगिरी महाविद्यालयात होणाऱ्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दुपारी ४ वाजता खासदार सुप्रिया मुळे यांच्या हस्ते होणार आहे.
मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या वक्तृत्वाला वाव मिळावा या साठी आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने मागील पाच वर्षांपासून ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ात ५ जानेवारीला स्पर्धेच्या जिल्हानिहाय फेऱ्या घेण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्य़ातील पहिले तीन विजेते स्पर्धक या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरले. रवींद्रनाथ टागोर सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धा सुरू होईल. आमदार हेमंत टकले उद्घाटक आहेत.
महाअंतिम फेरीसाठी ‘राजकारणापलीकडे शरद पवार’, ‘सहिष्णुतेच्या देशात असहिष्णुतेचे राजकारण’, ‘सावकार अन् सरकारच्या विळख्यात अडकलेला शेतकरी माझा’, ‘शंभरात नव्वद परेशान, फिर भी मेरा भारत महान’ हे विषय ठेवण्यात आले आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे २१, १५ व ११ हजारांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speech competition