छत्रपती संभाजीनगर : गेल्या सहा महिन्यांपासून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या जरी चर्चा सुरू असल्या तरी माझ्याच नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.पत्रकार परिषदेतील या वक्तव्यानंतर ‘भाजपला द्या टोले, नाना पटोले’ अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी मणिपूरमधील महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून भाजप विरोधात घोषणाबाजी करत क्रांती चौकात आंदोलन केले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्यानंतर विदर्भातच प्रदेशाध्यक्षपद आणि विरोधी पक्ष नेतेपद असल्याने समतोल राखण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद अन्य व्यक्तीकडे दिले जाण्याची चर्चा सुरू झाली.
ही चर्चा गेले सहा महिने सुरू आहे. मात्र, त्यात काही तथ्य नसल्याचे पटोले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हेही भाजपच्या नेत्यांना भेटले असल्याने तेही अजित दादा गटात जाण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले,‘राष्ट्रवादीमध्ये काय घडते आहे, याची चिंता आम्ही करत नाही. त्यांच्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे ते म्हणाले. मात्र, महाविकास आघाडीवर त्याचे काही परिणाम होतील का, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. शेवटी महाविकास आघाडीचा बाप हा बाप आहे, असे ते म्हणाले. नेतृत्व कॉंग्रेसच्या हातात असल्याने अन्य दोन पक्ष काय करतात हे महत्त्वाचे नाही, असे त्यांना सुचवायचे होते. या पत्रकार बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, अनिल पटेल उपस्थित होते.