प्रवासी भारमान घसरले; ८० लाखांचा फटका
एप्रिलपासून उन्हाळी सुट्टय़ांचा मौसम सुरू झाल्यानंतर एस.टी. महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीत कमालीची वाढ होत असल्याने उत्पन्नही वाढते. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे इतर उद्योगधंद्यांप्रमाणे एस.टी.च्या उत्पन्नावरही परिणाम झाला असून १ ते ११ मे दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ८० लाखांचा फटका बसला आहे. १९ हजार किलोमीटरची वाहतूक कमी झाली असून प्रवासी भारमानात सात टक्क्यांनी घट झाल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
बीड जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या ८ आगारांमधून ५०० पेक्षा जास्त बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उन्हाळी सुट्टय़ांचा मौसम सुरू होताच गावागावात यात्रा, उत्सव, लग्नसराई असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात शहरातील प्रवासी गावाकडे जातात. दिवाळी आणि उन्हाळी या दोन्ही सुट्टय़ांच्या कालावधीत एस.टी.च्या उत्पन्नात वाढ होत असल्याने जादा गाडय़ा, प्रासंगिक करार, जास्तीच्या फेऱ्या केल्या जातात. यंदा मात्र सुट्टय़ांमध्ये सात टक्क्यांनी प्रवासी भारमानात घट झाल्याचे दिसू लागले. गावागावांतील पाणीटंचाई, वाढलेली उन्हाची तीव्रता आणि आíथक चणचण यामुळे शहरातून गावाकडे जाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी एस.टी.ने दोन बाय दोन आसन क्षमता असलेल्या १७ निमआराम गाडय़ा सुरू केल्या आहेत. सुरुवातीला या गाडय़ांना चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, आता प्रतिसाद ओसरला आहे. इतर उद्योगधंद्यांप्रमाणेच एस.टी.लाही दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे.