परभणी जिल्ह्य़ात मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू असताना ढालेगाव व ताडबोरगाव येथे शेतकऱ्यांनी ‘आश्वासने नकोत कर्जमाफीचे बोला’ अशी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला रस्त्यात अडथळा निर्माण होऊ नये, या साठी पेडगाव फाटय़ावर भाकप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, सिंगणापूर फाटय़ावर माकप कार्यकत्रे व पोलीस यांची धुमश्चक्री होऊन पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून माकप कार्यकत्रे व शेतकऱ्यांनी पोलिसांच्या गाडय़ांवर जोरदार दगडफेक केली. यात २ पोलीस अधिकाऱ्यांसह ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांच्या चार गाडय़ांचे मोठे नुकसान झाले.
मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सुरुवातीला ढालेगाव फाटय़ावर त्यांनी भाषण सुरू केले. या वेळी काही शेतकऱ्यांनी उठून कर्जमाफीसाठी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ताडबोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हाच प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीच्या घोषणेने भंडावून सोडल्यानंतर पुढे अडथळा येऊ नये, म्हणून पोलिसांनी माकप, भाकप कार्यकत्रे व शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री ताडबोरगावाहून निघण्यापूर्वीच भाकपच्या कॉ. राजन क्षीरसागर यांच्यासह ४० कार्यकर्त्यांना अटक करून पोलीस मुख्यालयात आणण्यात आले.
असाच प्रकार सिंगणापूर फाटय़ावर होत असताना माकपच्या कॉ. विलास बाबर यांनी अटकेस विरोध केला. पोलीस जबरदस्तीने कार्यकर्त्यांना गाडय़ांमध्ये कोंबत असताना झटापट झाली. पोलिसांनी दबंगगिरी करीत थेट शेतकऱ्यांवर लाठय़ाकाठय़ा चालवण्यास सुरुवात केली. यामध्ये काही शेतकरी किरकोळ जखमी झाले, तर पोलिसांच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस गाडय़ांवरच दगडफेक केली. यात पोलीस व्हॅनसह (एमएच २२, ७९९४) तीन पोलीस जीपच्या काचा फोडण्यात आल्या. दगडफेकीत गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजय कुहीकर, सहायक निरीक्षक सुनील पुंगळे, हवालदार शबीर पठाण, मोईन कॅप्टन, कांबळे, श्रीमती लटपटे, नागरे यांच्यासह १३ जण जखमी झाले.
बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात जिल्ह्याची आढावा बठक नांदेडला घेण्याचे स्पष्ट झाले. यानंतर भाकप, माकप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे स्थळ बदलले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी खुद्द पोलीस अधिक्षिका नियती ठाकर ताडबोरगावला घेऊन गेल्या. परंतु तेथे स्वतंत्र भेट न मिळाल्याने कर्जमाफी द्या, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या वेळी पालकमंत्री रावते यांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकत्रे शांत झाले. भाकपनेही पेडगाव येथे आंदोलन करण्याचे निश्चित केले. तेथेही दोनशे ते अडीचशे शेतकरी जमले होते. माकपने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सिंगणापूर फाटय़ाची निवड केली. परंतु मुख्यमंत्र्यांना ढालेगाव व पेडगाव येथे आलेल्या शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना पुढे करता येऊ नये, म्हणून पोलिसांनी पेडगाव येथे कार्यकर्त्यांना अटक, तर सिंगणापूर येथे लाठीमार करून हुसकावण्याचा प्रयत्न केला. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी घटनास्थळी आल्यानंतर आंदोलनकत्रे शेतकरी शेतात पांगले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे गंगाखेडकडे रवाना झाला.
‘मुख्यमंत्र्यांचा दौरा राजकीय प्रेरित’
मुख्यमंत्र्यांचा परभणी जिल्हा दौरा राजकीय प्रेरित असून, १९७२ पेक्षाही भयावह दुष्काळ असताना उपाययोजना करण्याची या सरकारची इच्छा नाही. दुष्काळात पूर्वीच्या उपाययोजनेला कात्री लावण्याचे काम केले जात आहे. दुष्काळ जाहीर झाला तरी शेतकऱ्यांना लाभ मिळू नये, असे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दुष्काळात मदत न देता पोलिसांकडून दडपशाहीसाठी पोलीस यंत्रणा वापरली जात असेल तर आम्ही विरोध करणारच.
– राजन क्षीरसागर
‘पोलिसांची दंडेलशाही’
जिल्हा आढावा बठकीचे स्थळ बदलल्यामुळे मुख्यमंत्री गंगाखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर धरणे आंदोलन करून निवेदन देण्याचा निर्णय घेतला. या संबंधी रात्रीच प्रशासनाला कळविले होते. परंतु मुख्यमंत्री सिंगणापूर फाटय़ावर येण्यापूर्वीच पोलिसांनी दंडेलशाही करीत कार्यकर्त्यांना गाडीत कोंबण्यास सुरुवात केली. यास प्रत्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांकडून संतप्त भावना निर्माण होणे साहजिक आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन स्वीकारायचे नसेल तर त्यांनी खुशाल पुढे जावे, परंतु आम्हाला अटक करण्याचे कारण नव्हते.
– माकपचे विलास बाबर.
लाठीमारानंतर शेतकऱ्यांची पोलिसांच्या गाडीवर दगडफेक, ११ पोलीस जखमी
ताडबोरगाव येथे शेतकऱ्यांनी ‘आश्वासने नकोत कर्जमाफीचे बोला’ अशी घोषणाबाजी केली.
Written by बबन मिंडे
First published on: 04-09-2015 at 01:50 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stone throw on police van by farmer after police action