अर्थसंकल्पातून धनंजय मुंडेंच्या राजकारणाला बळ
औरंगाबाद : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळास आकार देत प्रति क्विंटल दहा रुपयाप्रमाणे जमा होणाऱ्या निधीमध्ये तेवढाच निधी राज्य सरकार तिजोरीतूनही देईल, या घोषणेसह गहिनीनाथ गड, भगवान गड या धार्मिक स्थळ विकासास निधी देण्याची अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणा समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वर्चस्व वाढविणाऱ्या असल्याचा संदेश मराठवाडय़ात गेला आहे.
राज्यातील बहुतांश साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी बीड जिल्ह्य़ातून तोडणीसाठी मजूर जातात. त्यांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा भाजप सरकारने केली होती. ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पंकजा मुंडे यांना करता आली नव्हती. ते महामंडळ करू दिले गेले नाही, असा उल्लेख पंकजा मुंडे यांनी नाराजीने केला होता. तेव्हापासून धनंजय मुंडे महामंडळ व्हावे यासाठी प्रयत्नशील होते.
महामंडळात जमा होणाऱ्या रकमेएवढी रक्कम दरवर्षी राज्य सरकारकडून दिली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. सरकार स्थापनेनंतर संशयाच्या भोवऱ्यात आणि नंतर महिलेवर केलेल्या बलात्काराच्या तक्रारीनंतर काहीसे मागच्या बाकावर असणाऱ्या मुंडे यांना अर्थसंकल्पातून शक्ती दिल्याचे मानले जात आहे. राज्यात ९२५ लाख टन ऊस गाळप होतो. त्यामुळे ९५ ते १०० कोटी रुपयांपर्यंतचा निधी महामंडळातून उभा राहील आणि तेवढाच निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. महामंडळची रचना भाजप सरकारने ठरविली असली तरी त्याला अधिकार देण्यात आले नव्हते. ते अधिकार देऊन अर्थसाहाय्य करण्याची भूमिका योग्य असल्याचे मत व्यक्त होत आहे. केंद्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, ‘हा वर्ग कष्ट करणारा आहे. त्यांच्या कल्याणासाठी लागणाऱ्या योजनांसाठी महामंडळाच्या माध्यमातून आता निधी मिळू शकेल.’ ऊस तोडणी कामगारांसाठी महामंडळ करतानाच भगवानबाबा गड, गहिनीनाथ गडासाठीही निधी दिला जाईल, असा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात आवर्जून केला. ऊसतोड कामगार वर्गाचे श्रद्धास्थान म्हणूनही या गडाची ओळख आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला पाठबळ मिळेल अशा तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. समाज कल्याण विभागाला एक हजार कोटी रुपयांची वाढ दिली असून ऊसतोड मजुरांच्या कल्याणासाठी निधीची तरतूद झाल्याने वर्षांनुवष्रे राबणाऱ्यांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.