औरंगाबाद येथे प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे रुपांतर तलवार हल्यापर्यंत झाले. त्यात आईवर होत असलेल्या तलवारीचा हल्ला स्वतःच्या अंगावर घेतलेला मुलगा जखमी झाला आहे. ही थरारक घटना बुधवारी (दि.९) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरात घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि.१०) जवाहरनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनालीने (नाव बदललेले) १८ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. तिला एक १७ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांची मुलगी आहे. दोन वर्षांपूर्वी सोनालीच्या पतीचे निधन झाले. तेव्हापासून मुलगा सोनालीसोबत तर मुलगी तिच्या आईकडे राहाते. दरम्यान, सोनालीचे तिचा मावस दीर अविनाश चिंधे (रा. शिवाजीनगर) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. दोन वर्षांपासून हे प्रेमसंबंध सुरू आहेत. या संबंधाची कुणकुण नातेवाईकांमध्ये सुरू झाली. बुधवारी सायंकाळी मुलाला योगेश चिंधे यांनी त्यांच्या दुकानावर बोलावून घेतले. तेथे त्याच्यासमोर सोनाली व अविनाशच्या संबंधाबाबत बोलणे झाले. योगेशने सोनालीच्या मुलाच्या कानाखाली मारली व त्यांच्या आईनेही त्याला फोनवरून शिवीगाळ केली. ते ऐकून तत्काळ आपण योगेशचे दुकान गाठल्याचे सोनालीने दिलेल्या तक्रारीत म्हटले.

हा वाद पुढे वाढला असता योगेशने कारमधून तलवार काढून सोनालीच्या अंगावर वार करीत असताना तिच्या मुलाने तो वार अंगावर झेलला. यात सोनालीचा मुलगा जखमी झाला. दरम्यान, अविनाश चिंधे व सचिन हावळे हे दोघे तेथे आले. अविनाशने मुलाला धक्का दिला तर योगेशने मुलाला पकडून ठेवले. या सर्व झटापटीत आपले मंगळसूत्रही गहाळ झाले. सचिनने आपल्या मुलाला धमकी दिल्याचेही सोनालीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान घटनेतील तिन्ही आरोपींविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader