विरोधी पक्षात असताना ८ हजार ५०० रुपये भाव द्या म्हणणारे आताचे सत्ताधारी कापसाला ३ हजार ८०० भाव कसा काय देतात,  असा सवाल करीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मलिदा खाण्यासाठीच मंत्री बबनराव लोणीकरांची धडपड सुरू असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
पालम नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी मुंडे यांची शनिवार बाजारातील मदानावर सभा झाली. व्यासपीठावर आमदार विजय भांबळे, डॉ. मधुसूदन केंद्रे, रामराव वडकुते, माजी आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड, जि. प. चे अध्यक्ष राजेश विटेकर आदींची उपस्थिती होती. मुंडे म्हणाले की, विरोधी पक्षात असताना शिवसेना-भाजपने कापसाला ८ हजार ५०० रुपयांचा दर देण्याची मागणी केली होती. आता ते सरकारमध्ये आहेत. मग त्यांनी ३ हजार ८०० रुपये दर का जाहीर केला, असा सवाल मुंडे यांनी केला. मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्यासाठी भाजपने आपली भूमिका जाहीर करावी, अशीही मागणी केली. शेतकऱ्यांची माती करणारे सरकार असून दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी हमीभावाचे दर पाडून सरकारला नेमके काय साध्य करायचे, असा सवालही केला.
पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना केवळ मलिदा खाण्यासाठी पाणीपुरवठा योजना आणायच्या आहेत. दिग्रस बंधाऱ्यात थेंबभर पाणी नसताना पालमकरांना शुद्ध पाणी कशातून देणार, असा सवालही मुंडे यांनी लोणीकरांना केला. या निवडणुकीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या घरातील चार उमेदवार आहेत. त्यांना इतर उमेदवार सापडले नाहीत का, असे सांगत नाव न घेता गणेश रोकडे यांनाही त्यांनी लक्ष केले. देशात सरकार कोणाचेही असो, विकासासाठी राष्ट्रवादी नेहमीच आक्रमक राहणार आहे. त्यामुळे पालमकरांनी भाजपच्या भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादीच्या हाती एकहाती सत्ता द्यावी, असे आवाहन केले.

Story img Loader