विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो, हे लक्षात घेऊन शाळेतच दप्तर ठेवण्याची सुविधा भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील बालाजी विद्यालयाने उपलब्ध करवून दिली आहे.
वर्गातच दप्तर ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना पेटय़ा उपलब्ध करवून देण्यात आल्या आहेत. इंग्रजी विषयाशी निगडित वह्य़ा-पुस्तके आणि दैनंदिन गृहपाठाच्या संदर्भातील वह्य़ा वगळता अन्य शैक्षणिक साहित्य आता विद्यार्थ्यांना शाळेतच ठेवता येणार आहे. घरी घेऊन जावयाच्या शैक्षणिक साहित्यासाठी शाळेने विद्यार्थ्यांना बॅगाही दिल्या आहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाटीवरील दप्तराच्या ओझ्याचा परिणाम पाठीचा मणका आणि सांध्यांवर होतो. त्यामुळे मणक्यांचा आकार बदलतो, चकतीचा ऱ्हास होतो. यामधून उद्भवणाऱ्या पाठदुखीमुळे विद्यार्थ्यांचा खेळांतील सहभाग कमी होतो आणि भविष्यात पाठदुखीची तीव्रता वाढते. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शासकीय पातळीवर विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याच्या संदर्भात विचार झाला. २५ नोव्हेंबर २०१४ रोजी राज्य शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याच्या संदर्भात उपाययोजना सूचविण्यासाठी समिती स्थापन केली आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक या समितीचे अध्यक्ष आहेत. अद्याप या समितीचा अहवाल शासनाकडे सादर झालेला नाही. हा अहवाल आल्यानंतर शासन दप्तरांचे ओझे कमी करण्याच्या संदर्भात कार्यवाही करू शकणार आहे.
शासकीय पातळीवर दप्तराचे ओझे कमी करण्याच्या संदर्भात विचार सुरू असताना वालसावंगी येथील बालाजी विद्यालयाने स्वत:च्या पुढाकाराने याबाबत निर्णय घेतला आहे. शाळेतच दप्तर ठेवता येत असल्याने दप्तराच्या ओझ्यातून मुक्तता झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा