छत्रपती संभाजीनगर: पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरणार्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरू असतानाच त्याला विरोध करत ५० ते १०० च्या संख्येच्या जमावाने वैजापूरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण ज-हाड यांना सोमवारी घेराव घालून रोष व्यक्त केला. ऐन संक्रांतीच्या दिवशीच पतंग उडवताना कारवाई होत असून, व्यापार्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप यावेळी जमावाकडून करण्यात आला.
हेही वाचा >>> हिंगोली : दुचाकी अपघाताचा बनाव; मुलाकडून आई-वडिलांसह भावाचा खून
नायलॉन मांजा विक्री विरोधात कारवाई करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश असून, कारवाईचा अहवाल प्रत्येक सुनावणीवेळी सादर केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्रीविरोधात सर्वत्रच कारवाई करून मांजा जप्त केला जात आहे. यातून वैजापूर येथेही प्रशासनाकडून काही व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एक-दोन दिवसात जवळपास 40 ते 45 दुकानांमधून नायलॉनचा मांजा जप्त करण्यात आला असून, गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यात सोमवारी संक्रांतीच्या दिवशी एक शेतकरी नायलॉन मांजामुळे गाल चिरून जखमी झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा कारवाईचे सत्र सुरू झाले. याच दरम्यान काही तरुणांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांना घेराव घालून त्यांच्यापुढे रोष व्यक्त केला.
व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी वैजापूर बंदचे आवाहन केले आहे. या माहितीला वैजापूरमधील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी दुजोरा देऊन संपूर्ण तालुक्यातील व्यापारपेठांमध्ये मंगळवारी बंद पुकारण्यात आला असल्याचे सांगितले. कोर्टाचे आदेश असल्याकडे डॉ. परदेशी यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी नायलॉन मांजाच्या संदर्भातली कारवाई पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. मात्र उपविभागीय अधिकारी हे बळेच कारवाईच्या प्रक्रियेत उतरून व्यापाऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप परदेशी यांनी केला. डॉ. जराड यांच्याकडून व्यापाऱ्यांना त्रास देण्यात येत असल्यासह काही गंभीर आरोपही डॉक्टर परदेशी यांनी केले. मंगळवारचा बंद सर्व पक्षीय असल्याचा दावाही डॉ. परदेशी यांनी केला.