छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यावरील भाजपा आवडत नाही. तसेच अजित पवार यांच्या पाठिंब्यावरील भाजपाही आवडत नाही. देशप्रेमाचा भाजपा आवडतो. ज्या भाजपाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत. विकासाला पुढे नेणारे आहेत म्हणून ज्यांनी-ज्यांनी भाजपाला पाठिंबा दिला त्यांना स्वीकारावे लागेल, असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केले. १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीसाठी तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम सांगता समारोहाचा तपशील ठरवण्यासाठी ते येथे आले होते.
हेही वाचा >>> काँग्रेसचेही अदाणींबरोबर संबंध? व्यवसाय, भेटी, पुरस्कार आणि बरंच काही…; भाजपाने यादीच केली जाहीर!
शरद पवार यांनी घोटाळय़ांची चौकशी करावी, असे म्हणताना शिवसेनेचेही नेते बसले होते. कदाचित त्यांची चौकशी व्हावी, असेही पवारांना अभिप्रेत असावे, असे म्हणत मुनगंटीवार यांनी इंडिया या शब्दाच्या इंग्रजी अक्षरातून एनडीए हे शब्द वगळल्यानंतर फक्त आय शिल्लक राहतो. मी आणि माझे, असेच त्यांचे राजकारण आहे. परिवार वादाभोवती पेरलेल्या या राजकारणातून सर्वाना सुटका हवी आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांनी आपल्याला आवडता भाजप कोणता या प्रश्नाच्या उत्तरात आम्ही व्यक्तिवादी राजकारण करत नाही तर विचारांसाठी राजकारण करतो. त्यामुळे कोण पाठिंबा देतो, कोणता व्यक्ती आहे, यापेक्षाही आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले. अंमलबजावणीत येतील असेच निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत होतील मराठवाडय़ाच्या विकासासाठी अल्प मुदतीचा व दीर्घ कालावधीच्या विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यात रोजगार, शिक्षण, सिंचन, पायाभूत सुविधा याबाबतचे प्रस्ताव तयार केले जाणार असून, कृषीच्या अंगाने कोणत्या वैशिष्टय़पूर्ण योजना घेता येतील, याची चर्चाही मंत्रीमंडळ पूर्व आढावा बैठकीत त्यांनी सांगितले. १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षे साजरे करताना होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी गृहमंत्री अमित शहा यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीही तसे निमंत्रण दिले आहे.