औरंगाबाद : दुष्काळी मराठवाडय़ात ऊस पिकविण्याची जिगर शेतकऱ्यांनी काही सोडली नाही. मोठय़ा प्रमाणात लागवड झाली आणि हुमणी नावाचा रोग उसाला जडला. उसाला राजकीय वरदहस्त असणारे पीक मानले जाते. त्यामुळे त्याची काळजी करणारेही अनेक जण. ऐन दुष्काळात कोरडवाहू पिकांबरोबरच हुमणी रोगाने किती क्षेत्र बाधित झाले आहे याचे तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केले जाणार आहेत. त्या प्रश्नांची माहिती गोळा करण्याची लगबग आता जिल्हास्तरावर सुरू झाली आहे. एका बाजूला दुष्काळाची तीव्रता वाढते आहे. दुसरीकडे ‘साखरमाया’ही वाढतेच आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्हय़ांसह धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्हय़ातील नऊ सुरू झालेल्या साखर कारखान्यांमध्ये तीन लाख ९१ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. ८.२८ शर्कराअंश दराने साखर निर्मिती सुरू आहे.
मराठवाडय़ात औरंगाबाद जिल्हय़ात २६ हजार ३३७ हेक्टर उसाची लागवड असून, त्यातील २२५७ हेक्टरवर उसाला हुमणी रोगाची लागण झाली आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची टक्केवारी तीन टक्के असली तरी सरकार दरबारी मात्र उसाची चिंता अधिक घेतली जात आहे. २६७५ शेतकऱ्यांना हुमणी रोगापासून उसाला वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याची एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. ५० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तीन लाख ६० हजार १२७ भित्तिपत्रके छापण्यात आली आहे.
११७० घडीपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठातील शास्त्रज्ञदेखील प्रभावित ऊसक्षेत्राला भेटी देत आहेत. परभणी जिल्हय़ात चार लाख ५७ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. ९७ गावांमधील ३३६० हेक्टरवरील ऊसपीक बाधित आहे. उस्मानाबाद जिल्हय़ात चार लाख ८८ हजार ५५६ हेक्टरवर ऊस आहे. या जिल्हय़ातही घडीपत्रिका आणि शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन प्रबोधन केले जात आहे. ज्या उसाला सर्वाधिक पाणी लागते, त्या उसाची चिंता वाहण्यात सर्व प्रशासन अग्रेसर असल्याची माहिती विधिमंडळातही कळविण्यात आली आहे. असलेल्या उसाचे गाळप सुरू झाले आहे. ‘साखरमाया’ अधिक वाढती राहावी, असे प्रयत्न केले जात आहे.