छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असून न्या. संत यांनी प्रतिवादी नीलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. नीलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
हेही वाचा : नांदेडजवळ खदानीत बुडून चौघांचा मृत्यू
माजी खासदार सुजय विखे यांनी ॲड. आश्विन होन यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत. तसेच नीलेश लंकेंनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्षातील खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही. परिणामी लंकेंनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातल्या मर्यादेचे उल्लंघन झालेले आहे, आदी मुद्यांवर सुजय विखे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर वरीलप्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.