औरंगाबादमध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयातून मुलाच्या नातेवाईकांनी १६ वर्षीय मुलीला मारहाण केली. बेदम मारहाण आणि संशय सहन न झाल्यामुळे मुलीने विष प्राषण करून आत्महत्या केली. दिव्या प्रभू गव्हाणे असे मृत मुलीची नाव अशून ती सोयगावजवळील बनोटी(वाडी) येथे राहते. आत्महत्या केलेली मुलगी दहावीची परीक्षा देत होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे.
शुक्रवारी गावातील कैलास छोटू सोनवणे याच्यासह रंजनाबाई गोटू सोनवणे, जागृतीबाई गोटू सोनवणे, सरलाबाई छोटू सोनवणे, आशाबाई बापू सूर्यवंशी(सर्व रा.वाडी, बनोटी) यांनी मुलीच्या घरी कोणी नसताना घरात प्रवेश केला. कैलास सोबत तुझे प्रेमप्रकरण असल्याचा जाब विचारत सर्वांनी तिला बेदम मारहाण केली. प्रेमप्रकरणाचा संशय आणि मारहाण असह्य झाल्याने दिव्याने विषारी द्रव्य प्राशन केले.
यानंतर तिला बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला जळगावच्या सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.