पूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तहसीलदारांच्या पथकावर वाळू तस्करांनी दगडांनी हल्ला केला. यात धामोरा गावचे तलाठी महेश भडके जखमी झाले. सिल्लोड तालुक्यातील धामोरा गावच्या शिवारात रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सिल्लोड पोलिसांनी पाच वाळू तस्करांविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद केली.
तहसीलदार रोकडे यांच्यासह तलाठय़ांचे हे पथक सकाळी वाळू तस्करांना प्रतिबंध करण्यास गेले होते. या वेळी तस्करांनी पथकाला अरेरावी करून शिवीगाळ, मारहाण व धमकी दिली. कृष्णा गंजीधर काकडे, अंकुश विठ्ठल काकडे, संदीप भानुदास काकडे, भानुदास काकडे व अर्जुन बाजीराव काकडे (सर्व धामोरा) अशी आरोपींची नावे असून, मारहाण केल्यानंतर हे सर्वजण फरारी झाले. पथकाला घटनास्थळी ३ ते ४जण दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैधरित्या वाळू भरत असल्याचे आढळून आले. अटकाव केला असता पथकास आरोपींनी अरेरावी करीत मारहाण केली.

Story img Loader