भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा होत असणारे कौडगाव बावी हे जिल्ह्य़ातील एकमेव गाव आता मात्र तब्बल सात वर्षांनी एकदाचे टँकरमुक्त झाले आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक नेतृत्वातून राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे ही किमया झाली आहे.
उस्मानाबाद शहरापासून केवळ २० किलोमीटर अंतरावरील कौडगाव बावी गावच्या पाणीटंचाईवर जिल्हा प्रशासनाला उपायच शोधता आला नाही. परिणामी सात वर्षांपासून या गावात टँकरच्या दोन खेपा एवढा एकमेव कार्यक्रम राबवला जात होता. मात्र, ग्रामस्थांनी सामूहिक नेतृत्वाची कास धरत गावात जलयुक्त शिवार अभियान राबवले. त्यामुळे तब्बल सात वर्षांनंतर गावातील झरे वाहू लागले आहेत. अध्र्या तपाहून अधिक काळ पाणी समस्येला तोंड देणारे हे गाव आता टँकरमुक्त झाले आहे.
जिल्ह्यातील कौडगाव बावी हे एकमेव गाव जिथे भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. गावाला शाश्वत पाणीपुरवठा योजना नाही. गावातील पाण्याचे नसíगक स्रोत मर्यादित. त्यामुळे पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. जिल्ह्याच्या ठिकाणापासून केवळ २० किलोमीटर अंतरावरील या गावाच्या पाणीटंचाईवर जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करण्याखेरीज दुसरा कुठलाच प्रभावी पर्याय सापडू शकला नाही. मात्र, दररोज टँकरच्या दोन-तीन खेपा, पाणी घेण्यावरून होणारे भांडणतंटे आणि एकूणच पाण्याची कमतरता ग्रामस्थांनाही अंगवळणी पडली होती. जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यात अनेक गावांनी स्वतहून प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. यात कौडगाव बावी हे गावही उत्स्फूर्त सहभागी झाले. लोकसहभाग व शासकीय मदतीतून १४ लाख रुपये खर्चून गावातील ओढय़ाला संजीवनी देण्यात आली. एरवी पाऊस पडल्यावर या ओढय़ातून पाणी वाहून जात होते. ग्रामस्थांनी सामूहिक नेतृत्वातून जलयुक्त शिवार अभियान राबविले आणि गावात पडलेल्या पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात थांबू लागले.
गावातील जाणते, वयोवृद्ध पुरूष आयुष्यात पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गावात पाणी साचल्याचे सांगतात. तब्बल १४० टीसीएम पाणी ग्रामस्थांनी सामूहिक नेतृत्वातून कामामुळे गावातच थांबले आहे. परिणामी परिसरातील विहिरींचे झरे वाहू लागले आहेत. अनेक वर्षांपूर्वी गुळण्या मारत आटलेल्या िवधन विहिरी पुन्हा जिवंत झाल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांना टँकरची वाट न पाहता, गावातच पाणी उपलब्ध होऊ लागल्यामुळे मोठय़ा आनंदाने साचलेल्या पाण्याची गावकरी पूजा करू लागले आहेत.
‘पाणी साचले, जलवाहिनीची गरज’
ग्रामस्थांच्या पुढाकारातून चांगली योजना राबविता आली. मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्यामुळे झालेला आनंद शब्दातीत आहे. गावातील विहिरी, िवधन विहिरींची पाणीपातळी वाढली. सात वर्षांपासून केवळ टँकरद्वारेच पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावातील जलवाहिनी अस्तित्वात राहिली नाही. ज्या िवधन विहिरींची पाणीपातळी वाढली, त्यातून गावची तहान भागविणे सहज शक्य होणार आहे. त्यासाठी जलवाहिनीची व्यवस्था करावी, अशी मागणी या सर्व चळवळीला मूर्त रूप देण्यासाठी पुढाकार घेणारे महादेव खटावकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.
तब्बल सात वर्षांनंतर कौडगाव बावी टँकरमुक्त!
भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा होत असणारे कौडगाव बावी हे जिल्ह्य़ातील एकमेव गाव आता मात्र तब्बल सात वर्षांनी एकदाचे टँकरमुक्त झाले आहे.
Written by दया ठोंबरे
आणखी वाचा
First published on: 23-09-2015 at 01:54 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanker free after7 years