तथागत बुध्दांच्या अहिंसात्मक विचारांमुळे भारतीयांचा पराभव झाला, असा हेतूत: खोटा प्रचार केला जातो. वास्तविक जातीचा, धर्माचा कर्मठ दुराभिमान बाळगल्यामुळेच भारतीय समाजव्यवस्था दुभंगली. या दुभंगलेल्या समाजव्यवस्थेत सर्वाना समानरीत्या पुढे जाण्याची संधी मिळावी, यासाठी तथागत गौतम बुध्द आणि संत तुकाराम यांनी केलेले काम आजच्या काळातही अनेक परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना दिशादर्शक ठरत असल्याचे डॉ. आ. ह. साळुंके यांनी सांगितले.
शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. तथागत बुध्द आणि संत तुकाराम या विषयावर बोलताना ते म्हणाले की, वर्तमानकाळात या दोन महामानवांच्या विचारांचे मूल्य संदर्भ काय आहेत, बुध्दांनी ईश्वराचे अस्तित्व स्पष्टपणे नाकारले. मात्र, त्यासंबंधी फारसे भाष्य केले नाही. मानवी दुखाचे मूळ काय आहे, या विषयांच्या उत्तरावरच ते एकाग्र झाले. बुध्दांप्रमाणेच संत तुकारामांनीही वेद प्रामाण्यवाद नाकारला. वेदात ज्या-ज्या ठिकाणी भेद आहे, तो वगळून केवळ विधायक बाबीच स्वीकारायला हव्यात, अशी शिकवण तुकारामांनी दिली.
परंपरेने सांगितले म्हणून, ग्रंथांनी सांगितले म्हणून, गुरूंनी सांगितले म्हणून स्वीकारू नका. समोर आलेला विचार स्वतच्या विवेक पातळीवरून तपासून घ्या आणि तो पटल्यानंतरच आत्मसात करा, हे बुध्दांनी घालून दिलेले तत्त्व म्हणजे लोकशाहीचा पाया असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, या दोन्ही महामानवांनी नाकारली. दोघांनीही त्यावर कडाडून टीका केली आहे. वर्णाचा अभिमान बाळगण्यापेक्षा व्यक्तींनी प्रयत्नवादी असायला हवे, असे तथागत बुध्दांनी नोंदविले असल्याचे त्यांनी सांगितले. स्वत: प्रयत्नवादी असलेल्या महाकवी संत तुकारामांना मात्र दैववादी ठरविण्याचे चुकीचे काम काहीजणांनी केले आहे. तुकाराम गाथेत, तुका म्हणे असे म्हणून अनेक विक्षिप्त अभंग घुसडण्यात आले आहेत. ते शुध्द करण्याचे काम हाती घ्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येकाची समज वेगवेगळी असते, बौध्दिक कुवत सारखी नसते. त्यामुळे कोणाच्याही घरी गेल्यानंतर त्यांच्या घराच्या भिंती तपासण्याऐवजी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तथागत बुध्द आणि संत तुकारामांनी ज्या पध्दतीने समाजाला शहाणे केले, ती पध्दत आचरणात आणायला हवी, असेही साळुंके यांनी सांगितले.
प्रारंभी संयोजन समितीच्या वतीने डॉ. स्मिता शहापूरकर यांनी साळुंके यांचे स्वागत केले. प्रास्ताविक अग्निवेश िशदे, सूत्रसंचालन प्रा. समाधान देशमुख तर आभार प्रा. रवी िनबाळकर यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा