लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : राज्य वस्तू व सेवा करात या वर्षी छत्रपती संभाजीनगर विभागातून १७ .४३ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात २३७८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. या वेळी तो २७९२ कोटी ५७ लाख रुपयांपर्यंत वाढला असल्याची माहिती वस्तू व सेवा कर विभागाचे सह आयुक्त अभिजीत राऊत यांनी दिली. ही वाढ राज्यांच्या वाढीच्या शेकडाप्रमाणापेक्षा अधिक आहे.
राज्यातील वाढीचे प्रमाण १४ टक्के एवढे आहे. तर उत्पादन शुल्कातून पाच हजार ८४३ कोटी रुपये कर रुपाने मिळाले आहेत. उत्पादन शुल्कातून अपेक्षित असणारे रक्कम सरकारला मिळाली नाही. ७२२० कोटी रुपये उत्पादन शुल्कातून मिळतील, असे अपेक्षित होते. संभाजीनगर विभागातून ८८३५ कोटी रुपयांची भर केवळ दोन कर रचनांमधून मिळाली आहे.
राज्य वस्तू व सेवा कराचा सर्वाधिक हिस्सा या वेळी वाहन उत्पादक कंपन्या आणि औषधी कंपन्यांकडून मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने कापूस उत्पादनातून मिळणारा कर वाढला असल्याचे सांगण्यात आले. विशेषत: भारतीय कापूस महामंडळाकडूनही करात मोठी वाढ झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुंतवणुकीस चालना मिळत आहे. ६९ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या विविध उद्योगातून वस्तू व सेवा कराची रक्कम भरली जाते. या वर्षी वाहन उत्पादन आणि विक्री यातून मोठा कर मिळेल, असे अपेक्षित होते. त्यात १७ टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ईव्ही कार व दुचाकी विक्री वाढावी म्हणूनही विशेष प्रयत्न करण्यात आले होते. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातून तसेच औषधी कंपन्यांकडून वस्तू व सेवा करामध्ये भर पडली आहे.
राज्य उत्पादन शुल्क पाच हजार ८०० कोटींहून अधिक
राज्य उत्पादन शुल्कामधून राज्य सरकारच्या तिजोरीत सात हजार १२० कोटी रुपये यावेत, असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र, मार्च अखेरीस राज्य उत्पादन शुल्क पाच हजार ८४३ कोटी रुपये झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मद्याचे बहुतांश उत्पादन हाेते. सहा बिअरच्या कंपन्या व विदेशी मद्य कंपन्या असल्याने यातून मिळणारे उत्पादन वाढलेले असते.
१२ कोटी ९ लाखाचा महसूल
वस्तू सेवा कराच्या थकबाकी वसुलीत आघाडी वस्तू सेवा कराची थकबाकी ठेवणाऱ्या उद्योजकांना अभय योजनेतून ३४३ अर्ज निकाली काढून ११ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी जमा करण्यात आली. ४०५ जणांची रक्कम भरून घेण्यात आली. २२ ते ३१ मार्च या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या योजनेतून १२ कोटी ९ लाखांचा महसूल मिळाल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.