छत्रपती संभाजीनगर ः शेअरखान कंपनीच्या नावाने खोटी ओळख दाखवून आयपीओ बनावट उपयोजनव्दारे (ॲप) विकत घेण्यास भाग पाडत शिक्षकाची ७१ लाखांची फसवणूक करण्यात आली. ६ जानेवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार हिमायतबाग परिसरात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे आपीओ विकत घेण्यासाठी शिक्षकाचे ३४ लाख रुपयाचे कर्जही आरोपींनी मंजूर केले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करुन नंतर सिटीचौक ठाण्यात वर्ग झाला आहे.
या प्रकरणी दिल्लीगेट परिसरातील रहिवासी आणि शिक्षक असलेले शेख आमेर यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये आमेर यांना गुगलवर शेअर मार्केट संदर्भात एक जाहीरात दिसली होती. त्यांनी या जाहिरातींवर प्रतिसाद (क्लीक) दिल्यानंतर त्यांना एका ग्रुपवर समाविष्ट करण्यात आले. यानंतर त्यांना व्हॉटसअप ग्रुपवर गुंतवणूकी संदर्भात माहिती देण्यात आली. त्यांना शेअरखान नावाच्या ॲपची लिंक पाठवण्यात आली. या लिंकवरून आमेर यांनी शेअरखान स्टॉक्स आयपीओ नावाने ॲप डाऊनलोड केले. यानंतर आमेर यांना विविध आमिष दाखवून आयपीओ खरेदीच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यावर ९ वेळेस ७१ लाखाची रक्कम उकळण्यात आली. ही रक्कम दिल्यानंतर आमेर यांनी वेगवेगळे आयपीओ खरेदी केल्याचे त्यांना ऑनलाईन दाखवण्यात येत होते. आमेर यांनी त्यांच्या नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ही रक्कम निघाली नाही. आमेर यांना संशय आल्याने त्यांनी शेअरखानच्या महाविर चौकातील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केली. यावेळी त्यांना शेअरखान कंपनीचे आयपीओचे कोणतेही ॲप नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आमेर यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी अनोळखी मोबाईलधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सचिन कुंभार तपास करीत आहेत.
आयपीओ खरेदीसाठी ३४ लाखाचे कर्ज
दरम्यान १७ फेब्रुवारीला आमेर यांना एका कंपनीचा आयपीओ खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांना रक्कम कमी पडत होती. यावेळी या भामट्यांनी त्यांना गळ घालीत ॲपवर लोन काढायला लावले. ३४ लाखाचे कर्ज काढल्यानंतर आमेर यांनी गुंतवणूक केलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना नकार देण्यात आला, यानंतर आपली फसवणूक झाल्याचे आमेर यांच्या लक्षात आले.