चुकीची माहिती भरणाऱ्या मुख्याध्यापक-शिक्षकांना तुरुंगात टाकतो, अशी भाषा विधान परिषदेत करणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यामधील विविध शाळांतील शिक्षकांनी शिक्षकदिनीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
शिक्षणमंत्री तावडे यांनी राज्यातील कामचुकार व चुकीची माहिती सरकारला सादर करणाऱ्या शिक्षकांना तुरुंगात टाकतो, अशा शब्दांत विधान परिषदेत शिक्षकांना इशारा दिला. शिक्षकी पेशा काही शिक्षकांच्या वाईट प्रवृत्तीमुळे बदनाम होत आहे. शिक्षणमंत्र्यांनी अशा शिक्षकांना धडा शिकविण्यासाठी तसा इशारा दिला. परंतु यामुळे सर्वच शिक्षकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे काही शिक्षक संघटनांनी शिक्षणमंत्र्यांनीच माफी मागावी, अशी मागणी केली.
राज्य प्राथमिक शिक्षक भारती या संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील ४४ निमशिक्षकांना तत्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात, शिक्षणमंत्र्यांनी आपले अपशब्द मागे घ्यावेत, वसतिशाळा शिक्षकांची २००१ पासूनची सेवा ग्राह्य धरावी, मार्च २०१४ ते जुल दरम्यानचे वसतिशाळा शिक्षकांचे थकीत वेतन मिळावे, २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी शिक्षकांनी शिक्षकदिनीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम. एन. गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष ए. जे. गोफणे यांच्यासह अन्य शिक्षकांनी सहभाग घेतला.

Story img Loader