छत्रपती संभाजीनगर : तुळजापूर मंदिराच्या कर्णशिळांना तडे गेल्यानंतर मंदिराचा कळस उतरवण्याची वेळ येऊ शकेल, अशा स्थितीमध्ये मंदिरातील भवानी मूर्तीला हलवायचे कसे, त्याचे विधी कोणते, याचा अभ्यास मंदिर समितीमार्फत केला जात असून, या अनुषंगाने शारदपीठाच्या शंकराचार्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिराचा कळसाचा भार सहन न झाल्याने कर्णशिळांना तडे गेले आहेत. त्यामुळे नवा कळस करताना तो सोनेरी करावा, असा मानस आमदार राणा जगजीतसिंह यांनी व्यक्त केला होता. मात्र, असे करताना कोणत्याही धर्मविधिचे उल्लंघन होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे.
मंदिर समितीच्या वतीने देवींच्या शक्तीपीठाचे शंकराचार्यांशी संपर्क साधला आहे. सोन्याचा कळस करण्यास या पीठाची कोणतीही अडचण नसल्याची चर्चा झाली आहे. मंदिरातील भवानीची मूर्ती कळस हलविण्याच्या काळात कोठे ठेवायची याचीही चर्चा धार्मिक संताबरोबर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी या अनुषंगाने शंकराचार्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
शारदापीठाच्या लेखी अहवालानंतर मूर्ती कोठे हलवायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. जेवढ्या काळात मूर्ती बाहेर असेल त्या काळातही कुलधर्म कुलाचार करता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. याच काळात म्हणजे आठ महिन्याच्या काळात शिळा घडवणे, मंदिराची नवी रचना करणे आदी कामे हाती घेतली जाणार असून पुढील सहा महिन्यात संपूर्ण काम केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
आतील बाजूने पंचधातू आणि वरुन सोन्याचा मुलामा असे मंदिराच्या कळसाचे स्वरुप असणार आहे. तिरुपती, शिर्डी येथील मंदिरांमध्ये ज्या पद्धतीने कळसाचे काम केले त्याच पद्धतीचे काम हाती घेण्यात येणार आहे. मंदिरातील कळसाचे काम करताना भवानी मूर्ती हलवू नये असे काही पूजाऱ्यांचे मत होते. मात्र, शिळा आहे त्या स्थितीमध्ये दुरुस्त करता येतात का, याची तपासणी करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांंकडून त्याची तपासणी केली जाणार आहे. धार्मिक विधी आणि पुरातत्वीय रचना याचा मेळ घालून परिपूर्ण विकासाच्या योजना हाती घेतल्याचा दावा मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे.