शनििशगणापूर येथील चौथाऱ्यावर जाऊन महिलेने दर्शन घेतल्याच्या घटनेवरून सर्वत्र गदारोळ उठलेला असताना महिलांना प्रवेश बंदी असा फलक असलेल्या शहरातील क्रांतीनगर भागातील हनुमान मंदिर महिलांसाठी खुले करावे, यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अॅड. हेमा िपपळे यांनी आंदोलन केले. मात्र, स्थानिक नागरिक व मंदिर व्यवस्थापनाने महिलांना प्रवेश नाकारल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मध्यस्थी केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
बीड शहरातील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस संकल्पसिध्दी हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारावरच स्त्रियांना प्रवेश करण्यास मनाई असल्याचा फलक लावलेला आहे. काही दिवसांपूर्वी शनििशगणापूर येथील चौथऱ्यावर जाऊन एका तरुणीने दर्शन घेतल्याच्या घटनेवरून राज्यभर गदारोळ उठलेला असतानाच रविवारी ३ जानेवारी रोजी सकाळी काही महिलांनी एकत्र येऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मंदिर सर्वासाठी खुले व्हावे, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अॅड. हेमा िपपळे यांनी केली. मंदिर व्यवस्थापन व नागरिकांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे, अशी मागणी लावून धरत मंदिर उघडून आरती करणारच असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. मंदिर प्रवेशावरुन वादविवाद होऊ नये म्हणून दंगल नियंत्रण पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही दाखल झाले होते. पोलीस आणि व्यवस्थापक समिती यांनी मध्यस्थी केल्याने अखेर महिलांनी प्रवेशाबाबतचे आंदोलन मागे घेतले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मंदिर प्रवेशाबाबतचे आंदोलन करुन मंदिर सर्वासाठी खुले करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
बीड शहरातील हनुमान मंदिरातील प्रवेशासाठी महिला आक्रमक
स्थानिक नागरिक व मंदिर व्यवस्थापनाने महिलांना प्रवेश नाकारल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 04-01-2016 at 01:55 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temple entrance woman aggressor