शहरात बुधवारी रात्री चार तरुणांच्या कारने दुचाकीसह महिला, मुलांना उडविल्यानंतर संतप्त जमावाने कारमधील तरूणांना बेदम मारहाण केली. दगडफेक करून कार फोडली. यात चौघेही गंभीर जखमी झाले. दगडफेकीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तगडा फौजफाटा तैनात केला. गांधीनगरमधील हनुमान गल्ली परिसरातील या घटनेनंतर पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हेल्मेट घालून रस्त्यावर उतरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
हेही वाचा >>> जलजीवन मिशनची ‘कासवगती’! पाइपचा अपुरा पुरवठा, कुशल कामगारांची वानवा
शेख इस्माइल शेख इब्राहीम (रा. अल्तमश कॉलनी), वसीम (रा. हुसेन कॉलनी), सय्यद इम्रान सय्यद नसीम आणि अबुझर सय्यद मुमताज अली (रा. बायजीपुरा) या जखमींची घाटीत नोंद आहे. अधिक माहितीनुसार, हे चारही तरुण कार घेऊन गांधीनगरमधून जात होते. त्यांनी एका दुचाकीला कट मारला. त्यानंतर तीन ते चार महिलांना धडक दिली. या अपघातानंतर संतप्त जमावाने तुफान दगडफेक करीत कारची तोडफोड केली. काही क्षणात झालेल्या या राड्यानंतर परिसरात काचा, दगड पडलेले दिसून आले. कारमधील चारही तरुणांना बेदम मारहाण केली. यात कारमधील चारही तरुण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यावर क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती.
पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे, असे स्पष्ट केले आहे. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे.