पूर्णा शहरात किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणानंतर दोन समाजांत जातीय तणाव निर्माण झाला. या वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकारानंतर बुधवारी पूर्णा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले. शहरात शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पूर्णा शहरात मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन गटांत मोटारसायकलला कट मारण्याच्या कारणावरुन वादावादी झाली. यानंतर काही वेळाने दोन समाजाचा मोठा जमाव गावात जमल्यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या वेळी जमावाने शहरात विविध ठिकाणी दगडफेक केली. यात पाच पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर पाच नागरिक जखमी झाले. जमावाने पोलीस ठाण्याच्या परिसरात येऊनही गोंधळ घातला. स्थानकात ठाणे अंमलदारास अरेरावीची भाषा वापरली व दगडफेक केली. स्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. नंतर हवेत गोळीबार केला.
जमावाने शहरातील दुकानांवर दगडफेक केली. या प्रकारानंतर पोलीस अधीक्षक नियती ठाकर तात्काळ शहरात दाखल झाल्या. विविध ठिकाणांहून पोलीस बंदोबस्त मागवून स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या प्रकरणी बुधवारी पूर्णा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांच्या फिर्यादीवरुन ३० ते ४० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. प्रताप कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दुसऱ्या गुन्ह्यात २५-३० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला, तर अब्दुल मतीन वहीद कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन १०-१५ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
दरम्यान, या घटनेत पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्यासह जलाल सिद्दीकी, संदीप जाधव, समीर खान पठाण, संभाजी साळवे, महेश गजभार, कैलास कुरवारे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमी कर्मचाऱ्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पूर्णा शहरात तणावपूर्ण शांतता असून दंगा नियंत्रण पथकासह बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिसांनी शहरात बुधवारी पथसंचलन केले.

Story img Loader