विशेष प्रतिनिधी लोकसत्ता 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) गटाकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. एकेकाळी धनंजय मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते अशी ओळख असणारी सोनवणे साखर कारखांनदार. दोन साखर कारखाने चालवत जिल्हा परिषदेच्या राजकारणात ते पुढाकार घेत होते. ज्योती मेटे की बजरंग सोनवणे हा तिढा बराच दिवस चालल्यानंतर शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांच्या नावाला पसंती दिली.

 जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आलेल्या सोनवणे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच लाख ९ हजार ८०७ मते मिळविली होती. मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनामुळे एकगठ्ठा झालेला मराठा समाज प्रस्थापित नेत्यांनाही मोजायला तयार नसल्याने बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. बीड राजकारणावर मुंडे परिवाराचा वरचष्मा, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा, पक्षांतर्गत संघर्ष करणाऱ्या नेत्या पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे आणि त्यात आता धनंजय मुंडे यांची भर पडली असल्याने अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मराठा नेते प्रयत्न करत आहेत. पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जोरदार हल्ला चढविला होता. त्यालाही जातीय किनार असल्याची चर्चा तेव्हा होती.

हेही वाचा >>>“आम्ही खोटं-खोटं…”, पंतप्रधान मोदींकडे इशारा करत नितीश कुमारांनी युतीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे मूळ समर्थक. मूळ केज तालुक्यात त्यांचे गाव. याच तालुक्यात येडेश्वरी नावाचा साखर कारखाना ते चालवतात. केज तालुक्यातील चिंचोली माळी या जिल्हा परिषदेच्या गटातून बाबाराव आडसकर यांच्या तिसऱ्या पिढीतील ऋषिकेश आडसकर यांना पराभूत करून ते निवडून आले. तसेच रमेश आडसकर यांच्या पत्नी अर्चना आणि बजरंग सोनवणे यांच्या पत्नी रसिका यांची लढत युसूफ वडगाव गटात झाली, त्यात सोनवणे यांच्या पत्नी निवडून आल्या. जिल्हा परिषदेच्या राजकारणात आघाडीवर असणारे बजरंग सोनवणे यांनी पक्षांतर्गत फुटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले होते. पूर्वीही त्यांनी निवडणूक लढविली होती.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The candidature of bajrang sonwane from the ncp sharad pawar group has been announced in beed lok sabha constituency amy