येथील चेलीपुरा भागातील एका गोदामाला लागलेल्या आगीत झाडू, खराटे, फिनेल आदी स्वच्छतेच्या वस्तूंसह इतर साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास घडली. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले असून या घटनेत सुमारे एक कोटींचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गोदामातील आगीची झळ लागून लगतच्या चार ते पाच घरांमधील साहित्य निकामी झाले असून भिंतीनाही तडे गेल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

या संदर्भात अधिक माहिती देताना अग्निशामक केंद्र अधिकारी अजिज यांनी सांगितले की चेलीपुरा भागातील शेख रशीदभाई यांच्या गोदामाला आग लागल्याचा फोन पहाटे ३.५५ वाजता आला. पदमपुरा अग्निशमन केंद्रातील एक बंब रवाना झाला. हरि घुगे अग्निशमन अधिकारी सुरे आदींचे प्रथक रवाना झाले. मात्र ज्वाळांचे लोळ पाहता सिडको, चिकलठाणा येथूनही बंबांना पाचारण करण्यात आले. आठ अग्निशामक बंब, सहा पाण्याचे टँकर व एक जेसीबी आणावा लागला. आग विझवण्यासाठी तीन ते चार तास लागले.

Story img Loader