होळीनिमित्त देशभरात रंगाची उधळण होत असताना काही विचित्र परंपराही पहायला मिळत आहेत. अशीच एक परंपरा बीडमध्ये दरवर्षी पहायला मिळते. बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी गावच्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची येथे परंपरा आहे. यावर्षी देखील ही परंपरा कायम ठेवत विडेकरांनी वाजत गाजत एका जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढली.

विडा येथील आनंदराव ठाकूर यांनी निजाम काळात ऐंशी वर्षांपूर्वी धूलिवंदनाच्या दिवशी स्वतःच्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली होती. तेव्हापासून दरवर्षी विड्यात जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्यात येते.

धूलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून ढोल ताशांच्या गजरात रंगांची उधळण करीत गावभर मिरवणूक काढली जाते. मिरवणूक हनुमान मंदिराजवळ आल्यावर मिरवणुकीचा शेवट करताना ग्रामस्थांच्यावतीने जावयाला कपड्यांचा आहेर केला जातो. या मिरवणुकीचा मान कोणाला मिळणार याची मोठी उत्सुकता परिसरात असते. धुलिवंदनाच्या अगोदर गावकरी वेगवेगळे गट करून समूहाने जवयाच्या गावाला जातात आणि त्याला पकडून आणतात. मिरवणुकीच्या भीतीपोटी जावई देखील दोन दिवस भूमिगत राहत असलेले अनेक किस्से सांगितले जात आहेत.

Story img Loader